गेल्या काही वर्षांत भारतात एलईडी लाईट्सचा वापर वाढला आहे. जास्त प्रकाश आणि कमी खर्च यामुळे एलईडी लाईट्स ग्राहकांच्या पसंतीस उरले. त्यामुळे एलईडी लाईट्सच्या मागणीत दिवसागणिक वाढ होत आहे. टीव्हीच्या ट्युबमध्ये, मोबाईल स्क्रीनमध्येदेखील एलईडी लाईट्स वापरण्यात येतात. अतिशय आकर्षक दिसणारे, किफायतशीर ठरणारे हे लाईट्स शरीरासाठी मात्र हानीकारक असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. वर्ल्ड जनरल ऑफ बायोलॉजिकल सायकाट्रीनं प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात एलईडी लाईट्समुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली आहे. मोबाईलमधल्या ब्लू लाईटचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय विविध प्रकारचे डोळ्यांचे विकारदेखील उद्भवण्याची दाट शक्यता असते. मोबाईलमधून निघणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण जास्त असल्यास मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते, असं संशोधकांनी आधी सांगितलं होतं. मात्र आता संशोधकांनी समोर आणलेली माहिती अतिशय चिंताजनक आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या प्रकाशाचे मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होतात. माणसाच्या संपूर्ण शारीरिक प्रक्रियेवरदेखील एलईडी लाईट्सचे परिणाम दिसून येतात.पथदिवे, लाईटिंग, मोबाईलचा डिम लाईट यामुळे डोळ्यांना रंगांशी संबंधित विकार होतात. काहींना रंग ओळखण्यात समस्या (कलर ब्लाईंडनेस) येतात. मोबाईलमधला डिम ब्ल्यू लाईट मेलाटोनिनचं उत्सर्जन थांबवतो. याचे झोपेवर गंभीर परिणाम होतात. झोपेचं चक्र बिघडतं. एलईडी फ्लॅश असलेल्या उपकरणांमुळे निद्रानाशाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा उपकरणांचा वापर झोपण्यापूर्वी ३० मिनिटं करू नये, असा सल्ला दिला जातो.
एलईडी लाईट्सचे घातक परिणाम जाणून घ्या; वेळीच सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 3:52 PM