Health : आला हिवाळा, आरोग्य सांभाळा !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 11:35 AM
हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात.
हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. थंडीची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्याचेही अनेक प्रश्न निर्माण होत असतात. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आज आपण घेत आहोत. * सांधेदुखीथंडीच्या दिवसांत मुख्यत: सांधेदुखीची समस्या डोकं वर काढते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत. थंड पाण्यात काम करणं टाळावं. शिळं आणि थंड अन्न घेऊ नये. बटाटे, उसळी, ब्रेड तसेच बेकरीचे पदार्थ, डाळी आणि डाळींच्या पीठाचे पदार्थ टाळावेत. मांसाहार पूर्णत: वर्ज्य करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे. थंड पाण्यापेक्षा कोमठ पाणी प्यावं. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत अतिश्रम करणं टाळावं. रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मालिश करावं. विविध प्रकारचे गुग्गुळ, दशमुळांचा काढा तसेच इतर वनौषधींचा उपयोग वैद्यकीय सल्याने केल्यास सांधेदुखीचा त्रास आपण टाळू शकतो. * दमादम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. थंडीत छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं. रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुवेर्दातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी २ ते ३ कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमठ काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे कोबी पाण्यात टाकून गरम करून त्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाºया व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण इत्यादी आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.* तळपायाच्या भेगाहिवाळ्यात अनेकांच्या हातापायांच्या तळव्यांना भेगा पडतात. काही वेळेस या भेगा एवढं उग्ररुप धारण करतात की भेगांतून रक्तही येतं आणि वेदना असह्य होतात. थंडीमध्ये शरिरात रुक्षता म्हणजेच कोरडेपणा येतो आणि हातापायाच्या तळव्यांवरील त्वचा फाटते. त्वचा फाटल्याने भेगा तयार होता आणि त्या दुखतात किंवा अशा भेगांची आग होते. रुक्षान्नाच्या अतिसेवनामुळेही भेगा पडण्याचा आजार बळावू शकतो. म्हणून हातापायांच्या तळव्यांना भेगा पडण्याचा त्रास असणाºया व्यक्तींनी आहारात साजूक तुपाचा समावेश करावा. आहारात दूध, तुपासारखे स्निग्ध पदार्थ वाढवावेत. लोणचे, मिरचीचा ठेचा तसेच अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जागरणामुळेही शरिरात रुक्षता वाढत असल्याने रात्री जागरण करणं टाळावं. रात्री झोपताना भेगांना साजूक तूप लावावे. चंदन, लाख, ज्येष्ठमध त्याचप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी तेल भेगांवर लावावीत. ज्येष्ठमध साजूक तुपात टाकून पिल्यामुळंही भेगांचा त्रास कमी होण्यास मदत होते.* त्वचेची काळजीहिवाळ्यात साधारणपणे रात्री थंड आणि दिवसा कडक उन असं वातावरण असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीमुळे त्वचेतल्या तैलग्रंथी निष्क्रीय होऊन त्वचा निस्तेज आणि रखरखीत बनते. चेहऱ्यावर सुरकुत्या, त्वचा फाटणे, ओठ फुटणे अशा तक्रारी वाढतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यावी लागते. घराबाहेर पडताना चांगले विंटरकेअर लोशन वापरावे. असे विंटरकेअर लोशन आयुर्वेदिक असेल तर उत्तमच. अंघोळीनंतर घरगुती उपाय म्हणून खोबरेल तेल, तिळाचे तेल, साय, लोणी तसेच तुपाचाही वापर क्रीमऐवजी करावा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी आहारात थोडे बदल करावेत. मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होतो. रात्री झोपताना साय किंवा तूप घेऊन त्यात चंदन टाकून मालिश केल्यानेही त्वचेला तेज प्राप्त होऊ शकते.