नवी दिल्ली : देशवासीयांना परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या दिशेने केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेद्वारे (PMBJP) लोकांमध्ये स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधे लोकप्रिय करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. देशभरातील जनऔषधी केंद्रांचा प्रचार करण्यासाठी 1 ते 7 मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
जन औषधी केंद्राविषयी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, सर्वांना परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी भारतात जवळपास 8,600 जन औषधी केंद्रे कार्यरत आहेत. या जनऔषधी केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ते 7 मार्च या कालावधीत जनऔषधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या केंद्रांमधून लाखो लोक स्वस्त दरात औषधे खरेदी करतात.
याचबरोबर जेनेरिक औषधांच्या वापराबाबत अधिक प्रोत्साहन आणि जनजागृती करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले. दरम्यान, 'जनऔषधी दिवस' चा मुख्य कार्यक्रम 7 मार्च 2022 (सोमवार) रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा उपस्थित राहणार आहेत.
फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI), फार्मास्युटिकल्स विभागाच्या अधिपत्याखालील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या देशभरात विविध ठिकाणी जनऔषधी सप्ताह साजरा केला जाणार आहे. यंदाचा हा चौथा जनऔषधी दिवस साजरा करण्यात येणार आहे. या जनऔषधी दिनाची थीम 'जन औषधी - जन उपयोगी' अशी ठेवण्यात आली आहे. यातून जेनेरिक औषधांचा वापर आणि जनऔषधी प्रकल्पाचे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण होईल.