नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा सर्वांचीच चिंता वाढवली आहे. भारतातही या नव्या कोरोना व्हायरसचा प्रवेश झाला आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 6 रुग्ण समोर आले आहेत. यातच, कोरोना लस नव्या स्ट्रेनवरही प्रभावी असेल. त्यामुळे लोकांना या स्ट्रेनला घाबराची गरज नाही, असा दावा आरोग्यमंत्रालयाने केला आहे.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन हे मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "लस यूके आणि दक्षिण अफ्रिकेत आढळणाऱ्या व्हेरिएन्टविरोधात काम करेल. कारण, सध्याची लस ही, या कोरोना व्हेरिएन्ट्सपासून बचाव करण्यात अयशस्वी ठरेल, याचा कसलाही पुरावा नाही." तर, केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, यूके व्हेरिएन्टचे वृत्त येण्यापूर्वीच, आम्ही प्रयोगशाळेमध्ये जवळपास 5,000 जीनोम विकसित केले होते. आता आम्ही त्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वृद्धी करू.
या पत्रकार परिषदेत ICMRचे डीजी प्रोफेसर बलराम भार्गव हेही उपस्थित होते. ते म्हणाले, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, की आपण व्हायरसवर फार अधिक प्रमाणात इम्यून प्रेशर टाकायला नको. जी थेरेपी लाभदायक आहे, तिचाच वापर आपण करायला हवा आणि जर फायदा होत नसेल, तर आपण त्या उपचारांचा वापर करायला नको. अन्यथा तसा उपचार व्हायरसवर प्रेशर टाकेल आणि तो अधिक म्यूटेट करेन.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले, नव्या स्ट्रेनने अनेक देशांचा प्रवास केला आहे. अशात आपल्याला अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. व्हायरसचा प्रसार रोखणे सोपे आहे. कारण ट्रांसमिशनची चैन अद्याप लहान आहे. ते म्हणाले, परदेशातून येणाऱ्या 20 पैकी एका प्रवाशाची यूके व्हेरिएन्टची टेस्ट केली जाईल.
सहा जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण -इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. इंग्लंडमधून भारतात परतलेल्या 6 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधून परतलेल्या 6 जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये 3 नमुने बेंगळुरू, 2 नमुने हैदराबाद आणि 1 नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व 6 जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या 6 जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
23 डिसेंबरपासून भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित -नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. आता 31 डिसेंबरनंतरही ही उड्डाणे रद्दच राहू शकतात. इंग्लंडमध्ये आढळून आलेला कोरोना व्हायरसचा हा नवा प्रकार अत्यंत वेगाने पसरत चालला आहे. एवढेच नाही, तर तो अधिक संक्रमक असल्याचेही बोलले जात आहे.
70 टक्के अधिक वेगाने होतो कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव -इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव 70 टक्के अधिक वेगाने होतो. आतापर्यंत जगभरातील 16 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी इंग्लंडमुधून होणारी विमान उड्डाणे स्थगित केली आहे.