सध्या हटके टॅटूची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांना टॅटू काढण्याची आवड असते. लोक अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी टॅटू काढतात, परंतु एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की ते आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. स्वीडनमध्ये केलेल्या एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की टॅटूमुळे ब्लड कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यामुळे, लिम्फोमा (Lymphoma) वाढण्याचा धोका २१ टक्के असू शकतो.
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, स्वीडनमधील लिंड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असं आढळून आलं की, टॅटूमुळे देखील कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. संशोधकांनी २००७ ते २०१७ या १० वर्षांसाठी स्वीडिश नॅशनल कॅन्सर रजिस्टरचं विश्लेषण केलं. यामध्ये २० ते ६० वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. टॅटू नसलेल्या लोकांपेक्षा टॅटू असलेल्या लोकांना लिम्फोमाचा धोका २१ टक्के जास्त असल्याचं या अभ्यासात आढळून आलं आहे.
गेल्या दोन वर्षांत टॅटू काढलेल्या लोकांमध्ये लिम्फोमाचा धोका ८१ टक्के जास्त होता. संशोधकांच्या मते, टॅटूसाठी कोणती शाई वापरली जात आहे, म्हणजेच त्यात कोणते केमिकल्स आहेत, ज्यामुळे लिम्फोमाचा धोका वाढू शकतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. मात्र, या दोघांमध्ये कनेक्शन असल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
टॅटू काढायचा असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. टॅटू काढण्यासाठी प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट निवडा. याशिवाय अशा ठिकाणी जा जेथे स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते. टॅटू मशीन पूर्णपणे स्वच्छ असावी. याशिवाय नेहमी चांगल्या ब्रँडची शाई वापरा. लोकल क्वालिटी असलेल्या शाईने टॅटू बनवू नका. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर स्कीन स्पेशलिस्टचा सल्ला अवश्य घ्या.