डॉ. राजेश बेंद्रे, मुख्य पॅथोलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स, मुंबई
Health Tips : बहुतेक जण नियमित तपासण्यांना महत्त्व देत नाहीत आणि दुर्लक्ष करतात. रोजच्या दगदगीच्या आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे आपण नियमित आरोग्यतपासणी करणे टाळतो. फक्त आजार झाला असेल तरच आपण चाचण्या करतो आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतो. या व्यतिरिक्त अनेक आरोग्य सर्वेक्षणांमधून असेही दिसून आले आहे की, महिलांच्या तुलनेने पुरुष कमी प्रमाणात प्रतिबंधात्मक तपासण्या करून घेतात.
चांगले आरोग्य व जीवनमानाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी योग्य वेळी तपासण्या करणे हा आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आरोग्याच्या समस्येकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या लक्षणांकडे तो आजार गंभीर स्वरुप धारण करण्याआधीच डोळस दृष्टीने पाहिले पाहिजे. डॉ. राजेश बेंद्रे, मुख्य पॅथोलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्स, मुंबई, ह्यानी पुढील तपासण्या करून घेणे महत्वाचे आहे हे सांगितले आहे जसे:-
रक्तदाबावर लक्ष ठेवणे : रक्तदाब हा कमी वेगाने मृत्यूच्या खाईत ढकलणारा आझार आहे. हायपरटेन्शनसाठी रक्तदाब हे एक प्रमुख कारण आहे तसेच यामुळे हृदय, फुफ्फुस, मेंदू, मूत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांना अपाय होऊ शकतो. रक्तदाबाची तपासणी ही एक महत्त्वाची तपासणी आणि अत्यंत सोपी, वेदनारहित असून त्याचे निष्कर्ष काही मिनिटांत समजतात. निरोगी रक्तदाब हा 120/80 एमएमएचजी इतका असतो. रक्तदाबाची कोणतीही लक्षणे नसतात. स्ट्रोक व हृदयविकाराच्या झटक्याची जोखीम कमी करण्यासाठी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे असते.
रक्तातील साखरेची तपासणी : ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता आहे त्यांनी रक्तातील साखरेच्या पातळीवर आवश्यक तेवढे नियंत्रण ठेवले पाहिजे. म्हणून रक्तातील साखरेची नियमित चाचणी केल्याने रक्तातील साखर वाढल्यास त्याचे निदान करण्यास व त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. तसेच सुरुवातीच्या टप्प्यातच, जीवनशैलीमध्ये बदल करून व उपचार घेऊन मधुमेहास प्रतिबंध करता येतो. आपल्याला HbA1C पातळीवरही लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. ही तीन महिन्यातील सरासरी रक्त शर्करा पातळी असते. ही चाचणी न्याहारीच्या आधी व नंतर केली जाते. यासोबतच दररोज 30 मिनिटांचा व्यायाम व सुयोग्य आहार यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करता येते आणि तुमच्या रक्तातील साखरेवरही नियंत्रण ठेवता येते.
लिपिड प्रोफाइल : रक्तातील कोलेस्टरॉल व ट्रायग्लिसराइडची पातळी मोजण्यास ही चाचणी मदत करते. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये फॅटी डिपॉझिट साचण्याची वाढती जोखीम दाखवून देण्यास ही चाचणी मदत करते. या डिपॉझिट्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा रक्तवाहिन्या निमुळत्या होऊ शकतात. परिणामी, हृदयातील रक्तवाहिन्यांचा आजार होण्याची शक्यता असते. चाळीशीच्या वर वय असलेल्या व्यक्तींनी दर पाच वर्षांतून एकदा लिपिड प्रोफाइल चाचणी करून घेण्यासाठी डॉक्टरची भेट घ्यावी. एखाद्या व्यक्तीला हृदयविकार, मधुमेह किंवा मूत्रपिंडाशी संबंधित आजार असतील तर ही चाचणी नियमितपणे करून घ्यावी.
कलोनोस्कोपी : कलोनोस्कोपी म्हणजे आतडाच्याच्या कर्करोगाची तपासणी. ज्यांना आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता आहे आणि ज्यांनी 40 किंवा त्याहून अधिक वय झाल्यावर कलोनोस्कोपी करण्यास सांगितली आहे, त्यांनी ही तपासणी करून घ्यावी. बहुधा, विष्ठेची तपासणी आणि ऑकल्ट ब्लडवर भर देऊन करण्यात यावी, फ्लेक्सिबल सिग्मॉइडोस्कोपी आणि / किंवा कलोनोस्कोपी आणि /किंवा सीटी कलोनोग्राफी दर पाच ते दहा वर्षांनी करावी. ज्यांना जोखीम जास्त आहे, त्यांना कलोनोस्कोपी अधिक वेळा करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
नेत्रतपासणी : वयाच्या चाळीशीमध्ये दृष्टी कमकुवत होणे सामान्य असते. या वयात बहुधा जवळचा चष्मा लागतो. नेत्रतज्ज्ञाची भेट घेणे हाच यावर उपाय आहे. तुमच्या दृष्टीमधील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी 40 वर्षांवरील पुरुषांनी दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. वाढत्या वयानुसार किंवा व्यक्तीला दृष्टी कमकुवत झाल्याचे जाणवत असेल तर नेत्रतपासणीची वारंवारता वाढत जाते. त्याचप्रमाणे ज्यांना ग्लाउकोमाचा धोका आहे आणि आपल्या चाळीशीत सुरू होऊ शकतो त्यांनी दर दोन वर्षांनी ग्लाउकोमाची चाचणी करावी. या व्यतिरिक्त मधुमेहींनी डायबेटिक रेटिनोपथीमुळे होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेव्यासाठी दर वर्षी नेत्र तपासणी करून घ्यावी.
वर नमूद केलेल्या चाचण्यांमुळे व्यक्ती निरोगी राहू शकते आणि त्या व्यक्तीचे जीवनमान सुधारू शकते. कारण यापैकी काही आजारांमध्ये लक्षणे दिसत नाही, आपल्याला काही आजार झाला आहे हे तपासणी न करता समजू शकत नाही. या व्यतिरिक्त, आजार झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक तपासण्या करणे सोपे व कमी खर्चिक असते. त्यामुळेच प्रतिबंध करणे हा उपचारांपेक्षा निश्चितच चांगले असते हे आचणात आणण्याची हीच योग्य वेळ आहे.