- डॉ राजू खुबचंदानी (वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ)खंरच कोरोना काळात काही मुलांना बाहेर सर्व बंद असल्यामुळे गोवरची लस मिळाली नाही का? ज्या मुलांत गोवर आढळला, त्यांचा वयोगट बघितला पाहिजे. जर तीन वर्षांवरील मुलांना झाला असेल, तर त्यांनी यापूर्वी लस घेतली होती का? पाच वर्षांपेक्षाही मोठ्या मुलांमध्ये लस घेऊनसुद्धा हा संसर्ग आढळून येतो का? या विविध प्रश्नांवर संशोधनाची गरज आहे. गेली ४१ वर्षे मी बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहे. गोवराची अशी साथ येणे गंभीर आहे. गेल्या १०-१२ वर्षांत मी गोवराचे एक-दोन रुग्ण पाहिले असतील. काही तरुण डॉक्टरांना तर रुग्णही पाहायला मिळाले नसतील. इतके गोवराचे प्रमाण मुंबईत कमी झाले होते. कारण आजाराला प्रतिबंध करणारी लस इतकी प्रभावी होती, की ती घेतली तर हा आजार होत नव्हता. म्हणून तरुण डॉक्टरांनी आता हे लक्षात ठेवले पाहिजे, की सध्या लाल पुरळ आणि ताप आला असेल, तर हा रुग्ण गोवराचा असू शकतो, हे गृहीत धरून तपासण्या आणि चाचण्या करून योग्य निदान करावे. मला आठवतंय मी १९९० ते २००२ अशी बारा वर्षे कस्तुरबा आणि नायर रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा देत होतो. त्यावेळी वर्षभरात एक असा सीझन यायचा त्यावेळी गोवराच्या आजाराने वॉर्ड पूर्ण भरलेला असायचा. रोज या आजाराने एक ते दोन मृत्यू व्हायचे. हा आजार गंभीर आहे. वेगाने पसरतो. त्याच्यावर योग्य वेळी योग्य उपचार गरजेचे असतात. योग्य उपचार न मिळाल्यास काहींना इतका त्रास होतो की त्यांच्या श्वसनव्यवस्थेवर परिणाम होतो. व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते.
पूर्वी लोकांत गैरसमज होता. गोवर आणि कांजण्याचा आजार झाला की त्याला देवी आली, असे म्हणायचे. मग त्याला कडुलिंबाची पाने पाण्यात घालून अंघोळ घातली जायची मात्र आता चित्र बदलले आहे. लसीचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळेच मागच्या काही वर्षांत गोवराचे रुग्ण पाहायला मिळत नव्हते. सध्याच्या या घडीला मी स्वतः काही दिवसांपूर्वी चार रुग्ण बघितले. त्या रुग्णाच्या पालकांना विचारले असता त्यांनी सांगितले अशा स्वरूपाचे रुग्ण आमच्याकडे आहेत. याचा अर्थ या आजाराची साथ वाढत आहे. याला वेळीच लसीकरणाच्या मार्गाने आळा घातला पाहिजे.