Health Tips : घर सांभाळणाऱ्या महिलांनी स्वत:ला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी नियमितपणे योगासन करणं गरजेचं आहे. घरकाम करत असल्यामुळे महिलांच्या शारीरिक हालचालींवर खूप मर्यादा आल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शरीराचं दुखणं आणि मानसिक समस्या दोन्हीही वाढलं आहे. परंतु योग साधनेचा आधार घेतल्याने आपली शारीरिक आणि मानसिक त्रासातून सूटका होऊ शकते. या प्रकारच्या त्रासात योगसाधनेतील काही आसनं लाभदायक ठरतात.
वृक्षासन-
वृक्षासन म्हणजे बॉडी स्ट्रेचिंगचा एक उत्तम प्रकार मानला जातो. मानवी शरीराचे संतुलन राखण्याकरिता शिवाय मेंदुची एकाग्रता क्षमता वाढविण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरतं. त्यामुळे गृहिणींनी विशेषत: घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांनी नियमितपणे वृक्षासन करावं, असं सांगितलं जातं.
वृक्षासन करण्याची पद्धत-
१) सुरुवातीला वृक्षासन करण्यासाठी आपले दोन्ही पाय सरळ पोजिशनमध्ये ठेवा. त्यानंतर व्यवस्थित दोन्ही पायांवर ताठ उभे राहा.
२) असं केल्यानंतर तुमचा उजवा पाय उचलून त्याला गुडघ्यातून वाकवा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या जांघेजवळ लावा आणि तशीच अवस्था कायम ठेवा.
३) या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून ठेवणं हा तुमच्यासाठी मोठा टास्क आहे.
४) शरीराचा तोल सावरल्यानंतर तुमचे दोन्ही हात सरळ डोक्यावर घ्या आणि त्यानंतर हातांचे तळवे एकमेकांवर जोडून नमस्कार करण्याची पोझ घ्या.
५) असं केल्याने एका पायावर शरीराचा तोल सावरणे सोपे जाते. कमीतकमी ३० सेकंद या अवस्थेत उभे रहावे. असं योगा एक्सपर्ट सांगतात.
फायदे-
वृक्षासनामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात. तसेच नियमितपणे वृक्षासन केल्यास फुफ्फुसाचे आरोग्य देखील सुधारेल.
भुजंगासन -
योगा एक्सपर्टच्या सल्ल्यानूसार भुजंगासनाचे अनेक फायदे आहेत. हे आसन केल्याने पोटाच्या स्नायूंना आकार येतो शिवाय पाठ आणि खांदे बळकट होण्यास मदत होते.
भुजंगासन कसं करावं?
१) भुजंगासन करताना जमिनीवर पालथं झोपावं. तुमचे पोट जमिनीला टेकलेलं असावं आणि हातांचे तळवे हे छातीखाली दाबलेले असावे.
२) त्यानंतर श्वास घेत हनुवटी वर करावी आणि हातांच्या तळव्यांवर दाब देत छाती वर उचलावी. छाती वर उचलताना हात पूर्ण ताठ न करता कोपरात वाकलेले असावे आणि छातीपासून पोटापर्यंतचा भाग वरच्या दिशेनं ताठ असावा.
३) साधारण २० ते ३० सेकंद या स्थितीत राहावं. नंतर श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकवावं. आणि हाताचे तळवे पुन्हा छातीखाली दाबावेत.
सूर्यनमस्कार-
दररोज सूर्यनमस्कार केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळता येऊ शकतात. १२ योगासनं मिळून सूर्यनमस्कार केला जातो. संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी सूर्यनमस्कार आवर्जून केला पाहिजे, असं योगातज्ज्ञांचं म्हणणं आहे. चला तर मग पाहूयात सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी फायदे…
फायदे-
सूर्यनमस्कारामुळे शरीर लवचिक बनते. पोटावरी चरबी कमी करण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे आसन लाभदायक ठरतं.
दररोज सूर्यनमस्कार केल्यास पायाचे स्नायू बळकट होऊन पाठीचा कणा, मानेचे स्नायू लवचिक होतात.