मॉन्डेलेझच्या कॅडबरी बोर्नव्हिटाशी निगडीत वादामुळे पुन्हा एकदा हेल्थ प्रोडक्टच्या साईड इफेक्ट्सचं प्रकरण चर्चेत आलंय. सोशल मीडिया इन्फ्युएन्सर रेवंत हिमात्सिंका यांनी दावा केला होता की बोर्नव्हिटामध्ये असे घटक असतात जे मधुमेह आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवतात. साखरेच्या अतिवापराचे धोके आपल्याला माहीत आहेत. विशेषत: यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणासह अनेक प्रकारच्या समस्या दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत स्वतःला विशेषतः लहान मुलांचे चुकीच्या परिणामांपासून संरक्षण करणं हे मोठं आव्हान आहे.
काय म्हणतात डॉक्टर्स?"आपल्या शरीराला साखरेची गरज असते. परंतु, कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त साखरेची गरज नसते. मुलांच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आपले शरीर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. पण , शरीराला सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, ज्यूस, मिठाई, डेझर्ट आणि कँडीजच्या रूपात अतिरिक्त साखरेची गरज नसते. दुधाचे पदार्थ, प्रक्रिया केलेली पेयं आणि पॅकेज केलेले पदार्थ यामध्ये आढळणाऱ्या साखरेचे जास्त सेवन केल्यानं लठ्ठपणा येऊ शकतो. मधुमेहाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये, तो नंतर कर्करोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल पातळी आणि टाइप २ मधुमेहाचे रूप घेतो,” अशी प्रतिक्रिया मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. विशाल परमार यांनी दिली.
साखरेचा किती वापर हवा?काही पालक आपल्या मुलांच्या साखरेच्या सेवनाबाबत काळजी घेतात. प्रश्न असा आहे की दोन वर्षाखालील मुलांना साखरेची गरज आहे का? परमार म्हणतात, "सुरुवातीच्या वर्षांत व्हाईट शुगर देऊ नये. विशेषत: जेव्हा मूल एक वर्षापेक्षा कमी असते, तेव्हा ती अजिबात देऊ नये. साखर जवळजवळ प्रत्येक गोष्टीत असते. कफ सिरप ते ब्रेडमध्येही ती असते. त्यामुळे लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. रात्रीच्या वेळी साखरेचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये हायपरॲक्टिव्हिटी, दात कमकुवत होणं यासारख्या समस्या दिसून येत असल्याचंही डॉ. परमार यांनी सांगितलं.
मोठ्यांसाठी किती मर्यादा?मुलांना आणि प्रौढांना दररोज किती साखर दिली जाऊ शकते हे त्यांचे वय, लिंग, कारण आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. अमेरिकन हार्ट असोसिएशननं साखरेसाठी काही मर्यादा दिल्या आहेत. यानुसार २ ते १८ वर्षे वयोगटातील बालकाला दररोज ६ चमचे साखर दिली जाऊ शकते. हे प्रमाण महिलांसाठी देखील सारखीच आहे. पुरुषांना दररोज ९ चमचेपेक्षा जास्त साखर दिली जाऊ शकत नाही, अशी माहिती गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या चीफ डायटिशियन नेहा पठानिया यांनी दिली.
गुळाचा वापर कराउसापासून बनवलेल्या पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गूळ, खजूर पावडर वापरणे फायदेशीर ठरते, असे मानले जाते. या संदर्भात पठानिया सांगतात की, गूळ ही पारंपरिक पद्धतीनं बनवलेली साखर आहे. गुळामध्ये साखरेव्यतिरिक्त अनेक प्रकारची मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढत नाही. मात्र, ही देखील एक प्रकारची साखर आहे आणि तिचा अतिवापर करणे हानिकारक ठरू शकते.
याचा होऊ शकतो फायदाजर तुम्हाला तुमच्या मुलांना साखरेच्या अतिवापरापासून वाचवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. प्रथम, अन्नपदार्थांमध्ये अतिरिक्त साखर घालणं टाळा. जंक फूडचा वापर करू नका. कँडी आणि कोलापासून शक्य तितके दूर रहा. मुलांना नॅचरल शुगर वापरण्यास प्रोत्साहित करा. यासाठी फळं खाणं उत्तम ठरेल. पॅकेज केलेले पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यात साखरेचं प्रमाण तपासा. तुमच्याकडे डेझर्ट असतील तर त्याचा वापर आठवड्यातून एकदाच करा.
(टीप - यामध्ये केवळ माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांशी किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.)