(Image Credit: www.vixendaily.com)
सध्याची लाइफस्टाईल इतकी बदलली आहे की, कामाचा स्ट्रेस, धावपळ, बदलतं वातावरण, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना सतत थकव्याचा त्रास जाणवतो. पण अनेकजण याकडे फार लक्ष देत नाहीत. आणि दुर्लक्ष केल्याने आणखी वेगळ्या समस्या निर्माण होतात.
थकवा येण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे यावर एकच काही रामबाण उपाय करुन तो घालवता येइल असे नाही. त्यामुळे काही वेगवेगळ्या गोष्टी करुन थकवा दूर केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ सततचा थकवा दूर करण्याचे काही खास उपाय...
भरपूर पाणी प्यावं
थकवा जाणवण्याचं मुख्य कारण हे पाणी कमी पिणे हे असू शकतं. अनेकदा कामाच्या गडबडीत तहान लागलेली असतानाही पाणी पिण्यावर भर दिल जात नाही. त्यामुळे थकवा जाणवतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तितकं पाणी रोज पिणे हा चांगला पर्याय आहे.
पुरेशी झोप
पुरेशी झोप न घेणे हे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक गोष्ट आहे. कमी झोपेमुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या डेली रुटीनमध्ये झोपण्यासाठी योग्य तो वेळ द्या. जास्त उशीरा झोपू नका आणि सकाळी लवकर उठा. याने तुमचा थकवाही दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
रोज व्यायाम करा
सकाळी लवकर उठून फार जास्त नाही पण थोडा वेळ जरी व्यायाम केला तर तुम्हाला याचे फायदे दिसतील. व्यायाम करण्यासाठी जिममध्येच गेलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही घरीही काही व्यायामांचे प्रकार करु शकता. त्यासोबतच थोडा वेळ चालणे हेही फायद्याचे ठरेल.
व्यवस्थित आंघोळ करा
जगातली सर्वात चांगला व्यायाम स्विमिंगला मानलं जातं. पण रोज स्विमिंग करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे निदान आंघोळीला योग्य वेळ द्या. थंडीचे दिवस सोडून इतर दिवशी थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्याचे तुम्हाला अनेक फायदे बघायला मिळतील. याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.
खाण्यात पोषक तत्वांचा करा समावेश
डाएटमध्ये पोषक तत्वांची कमतरता असल्याने शरीराला थकवा जाणवतो. जर तुम्हाला रोज असं वाटत असेल तर तुमच्या आहारात पोषक तत्व राहतील याची काळजी घ्या. आयर्न, प्रोटीन आणि फायबर युक्त आहार सेवन करा. जास्तीत जास्त फळं खावे.
फळांचा ज्यूस किंवा फळं खावीत
रोजच्या आहारातून जर तुम्हाला पोषक तत्व मिळत नसतील तर फळांचा ज्यूस सेवन करा. फळांच्या ज्यूसमुळे तुम्हाला एनर्जी मिळेल. लिंबू, संत्री, मोसंबी या फळांचा ज्यूस घ्या.
चॉकलेट खावे
जर काम करताना अचानक कमजोरीसारखे वाटत असेल तर लगेच चॉकलेट खाल्यास फायदा जाणवेल. चॉकलेटच्या सेवनामुळे स्ट्रेस कमी होतो आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळते.