Health Tips: आपल्यापैकी सगळ्यांचे सकाळचे वेळापत्रक अगदी निश्चित केलेले असते. शिवाय प्रत्येकाच्या आवडीनुसार खाण्या-पिण्याच्या सवयींमध्येही तफावत जाणवते. काही जण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी ड्रिंकला प्राधान्य देतात. मग त्यात वेगवेगळ्या फळांचे रस असो अथवा रेडिमेड उत्पादनं असो. तर याउलट फिटनेस फ्रेक जपणारे सकाळच्या वेळी भिजवलेले बदाम, काजू खाणे पसंत करतात. त्यापासून शरीराला असंख्य फायदे मिळतात. पण तुम्ही कधी सकाळची सुरुवात भिजवलेले शेंगदाणे खाऊन केलीय का? नाही ना... तर नाश्त्यामध्ये भिजवलेले दाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे असं आहारतज्ज्ञ सांगतात.
आजही खारे दाणे, भुईमुगाच्या शेंगा, दाणे आणि गूळ किंवा अगदी दाण्याचा लाडू लोक मोठ्या चवीने खातात. प्रोटीन, लोह यांचा उत्तम स्त्रोत असलेले हे दाणे आरोग्यासाठीही तितकेच लाभदायक आहेत.
पोषण तज्ज्ञांच्या मते, शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो. त्यामध्ये असलेले फॅटस, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम हे सगळे घटक आरोग्याचे भांडार आहेत.
हे फायदे जाणून घ्या-
१) पचनक्रिया सुधारते-
दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास पाचनक्रिया सुधारते. भिजवलेले शेंगदाणे पचायला हलके असतात. त्यामुळे पाचन संबंधित समस्याही दूर होतात.
२) हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर-
भिजवेलेल्या दाण्यांमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटस आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅटसचे गुणधर्म आढळतात. रोज सकाळी नाश्तामध्ये त्याचा समावेश केल्यास शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.शिवाय हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.
३) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो-
शेंगदाण्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात सापडते. त्याचा आहारात समावेश केल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या तक्रारींपासून दूर राहण्यास दाणे खाणे उपयुक्त ठरते.