Health Tips For Blood Donor : रक्तदान केल्यामुळे अनेक गरजू लोकांना जीवदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे असे म्हटले जाते. मात्र, वैद्यकीय शास्त्रात रक्तदान करताना काही निकषांचे पालन करणे आवश्यक असते. कुणालाही वाटले तर रक्तदान करता येत नाही. अनेकवेळा दुर्धर आजार, अपघातातील गंभीर दुखापतीमध्ये रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्यांचा जीव वाचविला जातो. त्यामुळे जे रक्त दिले जाते त्याची गुणवत्ता तपासणीचे काही निकष आखून देण्यात आले आहे. त्यानुसारच रक्तदान केले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते जर कुत्रा चावल्यामुळे रेबीजचे इंजेक्शन घेतले असेल तर अशा व्यक्तीला रक्तदान करू दिले जात नाही.
रक्तदात्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक-
रक्तदान करताना रक्तदात्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. रक्तदान करते वेळी त्यांना कोणताही आजार झालेला नसावा याची खात्री रक्तदान करताना रक्तदान केंद्रवार डॉक्टर करून घेत असतात. कारण कुठलाही आजार असताना रक्तदान करणे धोक्याचे असते. रक्तदान १८ वयाच्या पुढील व्यक्तीस करता येते. तर वयाच्या ६५ वयापर्यंत स्वैच्छिक पद्धतीने रक्तदान करता येऊ शकते. रक्तदात्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ च्या वरती असणे अपेक्षित असते. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यांची हिमोग्लोबिन मोजण्याची छोटी रक्तचाचणी केली जाते. त्यासोबत त्याचे वजन हे किमान ४५ किलोंच्यावर असणे अपेक्षित आहे.
विशेष करून गेल्या काही वर्षांत संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणवर सामाजिक संस्थांचा सहभाग नोंदविला जातो. पुरुषांना दर तीन महिन्यांनी तर महिलांना दर चार महिन्यांनी रक्तदान करता येते.
...यांना करता नाही येत रक्तदान
कॅन्सर, एचआयव्ही, काविळ, एपिलेप्सी त्यासोबत दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींना रक्तदान करता येत नाही. रक्तदान केंद्रावर सुद्धा याबाबत समुपदेशन केले जाते.
रक्तदात्याकडून रक्तदान करून घेताना वैद्यकीय शास्त्रात काही निकष आखून दिले आहेत. कोणत्या व्यक्तीने रक्तदान करावे आणि करू नये. त्या नियमाचे पालन रक्तदान शिबिरात केले जाते. रक्तदानापूर्वी माहिती विचारली जाते. काही चाचण्या करून वजन मोजून जर रक्तदाता रक्तदान करण्यास पात्र असेल तरच त्याला रक्तदान करून दिले जाते. - डॉ. योगानंद पाटील, (पॅथॉलॉजिस्ट), अतिरिक्त मुख्य वैद्यकीय संचालक, जगजीवन राम हॉस्पिटल
गर्भवतींना रक्तदान करता येते का?
१) गर्भवतींना रक्तदान करता येत नाही. कारण त्या काळात त्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणे गरजेचे असते.
२) पोटात बाळ असताना रक्तदान करता नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासोबत ज्या स्तनदा माता आणि मासिक पाळीच्या काळात महिलांना रक्तदान करता येत नाही.