Health Tips : मानवी शरीर हे ७० टक्के पाण्याने भरलेले असते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याची महत्वाची भूमिका असते. पाणी पिणं ही नेहमीचीच गोष्ट असली तरी सुदृढ व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला दररोज किती पाणी प्यावे हे समजून घेणे आवश्यक आहे. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी पाणी हा मूलभूत घटक असून, विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. साधारणतः दिवसातून सुमारे आठ ग्लास (२५० मिलीलीटरचा एक ग्लास) म्हणजेच अंदाजे दोन लीटर पाणी प्यावे, असं एक्सपर्ट सांगतात. वय, वजन, काम करण्याची पातळी आणि हवामान यासारख्या घटकांवर आधारित वैयक्तिक पाण्याची आवश्यकता बदलू शकते.
या लोकांनी कमी पाणी प्यावे-
पाण्याच्या अतिरेकाचा मूत्रपिंडावर परिणाम यकृत, मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनी कमी पाणी प्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसा एक ते दीड लीटर पर्यंत पाणी प्यायलं पाहिजे.
थंडी किंवा दमट हवेच्या ठिकाणी आपल्याला पाणी कमी प्यायला लागते. तसेच दिवसाचा जास्त काळ वातानुकूलित कार्यालयात काम करत असताना शरीरासाठी आर्द्रता योग्य असेल, तर पाणी कमी लागते. वातानुकूलित वातावरणात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या द्रव पदार्थाच्या गरजा कमी करू शकतात. डेस्कवर पाण्याची बाटली ठेवल्यास ती दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची आठवण करून देऊ शकते. प्रवासातही पाणी जास्त प्यावं. तुम्हाला किती तहान लागते व लघवी होते, यावर पाणी प्यावे. व्यायाम, आहार, गर्भावस्था, स्तनपान यांसारख्या गोष्टींनुसार पाणी पिण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.
एका दिवसाला किती पाणी प्यावे?
१) सात ते १२ महिन्यांच्या बाळास दिवसा ०.८ लीटर पाण्याची गरज असते. ते दूध, इतर द्रव पदार्थ किंवा पाणी यातून घेतले जाते. १ ते ३ वयाच्या बालकाला दिवसाला १.३ लीटर पाणी लागते. ४-८ वर्षे वयोगटांतील मुलासाठी १.७ लीटरची आवश्यकता असू शकते.
पाण्याच्या गरजेचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान व ज्या परिस्थितीत आपण काम करता किंवा राहता. खेळताना, उन्हात काम करताना किंवा ट्रेकिंग करताना जास्त पाणी लागते.
२) ९-१३ वयोगटांतील मुलाला दिवसाला २.४ लीटर, तर त्याच वयाच्या मुलीला २.१ लीटर पाणी लागते. १४-१८ वर्षे वयोगटांतील मुलांना दिवसाला ३.३ लीटर आणि मुलींना २.२ लीटर आवश्यक असते.
घामातून गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यासाठी सरबत, स्पोर्ट्स ड्रिक्स घेतली जातात. अशावेळी लघवीच्या रंगाचे निरीक्षण केल्यानेही हायड्रेशन स्थितीबद्दल अंदाज येतो. फिकट पिवळी लघवी सामान्यतः पुरेसे हायड्रेशन दर्शविते, तर गडद लघवी डिहायड्रेशनचे संकेत देऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिक, प्रौढांना कमी तहान लागू शकते. एखाद्याला जास्त तहान, भूक लागत असेल आणि जास्त लघवी होत असल्यास डॉक्टरांकडे जावे.