Monsoon health Tips : यंदाचा उन्हाळा इतका तापला की आपण सारेच वाट पाहतो आहोत की पाऊस कधी येईल! सूर्य अक्षरश: आग ओकत होता त्याने संपूर्ण महाराष्ट्र तापला. मान्सून दरवर्षी येतो तो आनंदाच्या धारा सोबत घेऊन येतो. सगळं अवतीभोवतीचं जग क्षणात बदलून जातं. हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरेला पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पण हे बदल घडतात आणि त्यासोबतच बदलते आपली तब्येत !
आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी.
सोपे साधे नियम-
सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
१) पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न खा. शक्यतो गरम अन्नपदार्थ खावेत.
२) बाहेर रस्त्यावरचं, हॉटेलातलं खाणं बंद करा. खायची वेळ आलीच तर गरम सूपसारखे पदार्थ खाण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात.
३) शक्यतो तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नका.
४) पचायला जड पदार्थ म्हणजे उसळ खाणं कमी करा. पचनशक्ती कमी असेल, वारंवार पित्त होत असेल तर उसळ न खाणंच योग्य.
५) विशेषत: पालेभाज्या खाणं पावसाळ्यात टाळावं. ज्यांचं पोट लवकर बिघडतं त्यांनी पालेभाज्या विशेषतः पालक खाणं टाळलेलंच बरं.
६) पाऊस म्हणजे वडे, भजी हे पदार्थ आवडीचे होतात. एखाद्यावेळी खाण्यात गैर काही नाही पण बेसनाचे, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पोट बिघडणारच त्यामुळे असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
७) ठेचे, मिरच्या, खूप तिखट झणझणीत न खाणंच बरं.
८) रोज सायंकाळी लवकर जेवा, हलकं जेवा म्हणजे पोटाचे त्रास होण्याचा धोका कमी होईल.
९) हायजिन सांभाळा, पावसाळ्यात सर्वप्रकारची स्वच्छता सांभाळा. घरात साचलेलं पाणी असेल तर मलेरियासहडेंग्यूचा धोका वाढतो.
१०) लहान मुलं-वृद्ध यांच्या आहाराची काळजी घेताना पौष्टिक म्हणून पचायला जड पदार्थ, सुकामेव्याचे, दुधाचे प्रमाण यासंबंधित डॉक्टरांशी बोलून ठरवा.