Parenting Tips : येत्या काही दिवसात मुलांच्या शाळा सुरू होतील आणि अशातच पाऊसही जोर धरू लागला आहे. अचानक जोरात पाऊस येणं, भिजणं आणि मग किरकोळ तब्येतीच्या तक्रारी सुरू होणं हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः या गोष्टी लहान वयाच्या मुलांमध्ये खूप कॉमन आहेत. त्यात मुलांच्या खाण्याच्या बदलत्या सवयी अजून भर घालतात. आई-बाबांनी मुलांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. पण तरीही मुलं आजारी पडतात. त्यांच्या काहीतरी बारीकसारीक तक्रारी चालूच राहतात आणि त्याचं कारण मात्र लक्षात येतच नाही. ते खरं कारण असतं बदलता ऋतू आणि वातावरणीय बदल. हवामानात, पाण्यात,आहारात वातावरणातील बदल समजून त्यात बदल केले की इन्फेक्शन आणि तब्येतीच्या तक्रारी टाळता येतील, असं आरोग्यतज्ज्ञाचं म्हणणं आहे.
काय करायला हवं? काही नियम तुमच्यासाठी...
१) बरीच मुलं दही, ताक, गार दूध हे पदार्थ आवडीने खातात. पण असे पदार्थ खाणं पावसाळ्यात टाळावं. दुधात थोडं पाणी घालून, पाव चमचा सुंठ पूड घालून दूध उकळावे व ते दूध प्यायला द्यावे. त्यामुळे मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही.
२) दुधात साखर घालून दिल्याने शरीरात कफ दोष वाढतो आणि लहान वय हे वाढीचे असल्यामुळे मुळातच लहान मुलांमध्ये कफाचे प्रमाण अधिक असते आणि साहजिकच कफाचे आजारही त्यामुळे पटकन होतात. म्हणून दुधात साखरेऐवजी मध घालून दिलं तर जास्त चांगलं. फक्त त्यावेळी दूध कडकडीत गरम नको.
३) मुलं भिजून आली तर त्यांचं अंग लगेच कोरडं करावं, डोकं पुसावं आणि आल्याचा थोडा रस मध मिसळून चाटवावा.
४) संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ अशी कफवर्धक फळं त्यांना देऊ नयेत. आईस्क्रीम, मिल्कशेक्स इ. पदार्थ देऊ नयेत.
५) चीज, पनीर हे पदार्थ लहान मुलं आवडीने खातात. त्यामुळे त्यांच्या आहारात बऱ्याच प्रमाणात या गोष्टी समाविष्ट केल्या जातात. परंतु, ते पचायला तर जड आहेतच पण शरीरात चिकटपणा व पर्यायाने कफ दोष वाढवतात. त्यामुळे चीज, पनीर एरव्हीही आणि विशेषतः पावसाळ्यात पचनशक्ती मंद झालेली असताना तर अजिबात देऊ नयेत.
६) शरीरातील कफ दोष नियंत्रित राहावा, यासाठी कोरडे पदार्थ चांगले काम करतात. म्हणून या मुलांना चणे, फुटाणे खाण्याची सवय लावावी. हे बल्य म्हणजे ताकत देणारे आहेत. हल्लीच्या भाषेत चांगले प्रोटीनचे सोर्स आहेत आणि कफ कमी करणारे आहेत. त्याबरोबर गूळ द्यावा म्हणजे चव वाढते, भूक भागते.
७) फुटाण्याचे डाळे, सुकं खोबरं, गूळ आणि तूप इतके साधे व घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून लाडू बनवून ठेवले व छोट्या सुट्टीतखाण्यासाठी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून दिले तरी मुलं आवडीने खातील.
८) कधीतरी चवीत बदल म्हणून नागली, मूग किंवा उडीद पापड भाजून खायला द्यायला हरकत नाही, तळून नको.
९) सर्व प्रकारच्या लाह्या या ओलावा कमीकरणाऱ्या, कफ शोषक आहेत. त्यामुळे साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिरा लाह्या हिंग, हळद यांची फोडणी करून चिवडा स्वरूपात देता येतील.
१०) पॉपकॉर्न म्हणजेच मक्याच्या लाह्या देण्यासही हरकत नाही. पण साध्या फोडणीच्या असाव्यात,चीजवाल्या नकोत.
११) भाज्या शक्यतो कोरड्या परतलेल्या असाव्यात, रस्सा नको.
१३) पालेभाज्या पावसाळ्यात चांगल्या मिळत नाहीत, लगेच सडतात. त्यांचा फार अट्टाहास धरू नये.
१४) फळभाज्या म्हणजे भेंडी, गिलकी, भोपळा, दोडका यांचा युक्तिपूर्वक मुलांच्या आहारात समावेश करावा.
१५) उसळी रुक्ष असल्याने कफ कमी करतात. परंतु वात दोष वाढवतात. त्यामुळे अधूनमधून देण्यास हरकत नाही.
१६) सवय लावली तर मुलं भाकरी आवडीने खातात. त्यांना गरम भाकरी लोणी किंवा तूप लावून द्यावी.
साधारण अशा प्रकारचा आहार पावसाळ्यात ठेवला तर फार आजारी न पडता लहान मुलांना चांगल्याप्रकारे आरोग्य टिकवता येईल.