Health Tips : पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. वातावरणातील बदलामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडू शकतात. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी किवी आणि ड्रॅगन फ्रुटसारख्या फळांचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
ड्रॅगन फ्रुटचे फायदे?
ड्रॅगन फ्रुट हे पोषकतत्त्वांनी समृद्ध, पौष्टिक, इम्युनिटीचे पॉवरहाऊस आहे. ते जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्रोत आहे. हे विशेषतः व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन बी ३ ने समृद्ध आहे. जे कोलेजनचे उत्पादन सुधारण्यासाठी, रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी आणि शरीरातील चयापचय मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
किवीचे फायदे काय?
किवी फळ हे सेरोटोनिनचे स्रोत आहे, जे चांगल्या झोपेसाठी मदत करू शकते. त्यामध्ये व्हिटॅमिन के असते, जे रक्त न गोठण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते तसेच शरीराद्वारे व्हिटॅमिन डी शोषण्यासही मदत करते.
पपई किती उपयुक्त?
पपई हे एक उष्णकटीबंधीय फळ असून, त्यात अ आणि सी जीवनसत्त्वे तसेच पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन व लाइकोपीन यासारखे इतर महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात. याच्या सेवनामुळे शरीरातील जळजळ कमी होते. अल्झायमरची प्रगती मंदावते तसेच निरोगी पचन आणि कर्करोग प्रतिबंध यासारखे आरोग्य फायदे मिळू शकतात.
सकाळी खावी की रात्री?
पपई : दररोज रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचनास मदत होते. बद्धकोष्ठता कमी होईल. नैसर्गिक एन्झाईम्स आणि आहारातील फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राखेल.
किवी : दररोज रिकाम्या पोटी किवी खाल्ल्यास त्यात असलेली पोषकतत्त्वे तुमचे शरीर डिटॉक्सिफाय करत तुम्हाला ऊर्जा देते.
ड्रॅगन फ्रुट : ड्रॅगन फ्रुट हे मध्यान्ह किंवा रात्रीदेखील खाऊ शकतो. रात्री त्याचे सेवन केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.