Health Tips For Thyroid Patient : आपल्याकडे आजही थायरॉइड या आजराबद्दल फारशी जनजागृती नाही. अनेकांना हा आजार असूनही ते अंगावरच काढत असतात. जोपर्यंत हा आजार बळावत नाही, तोपर्यंत फारसा कळत नाही. स्त्रियांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मोठ्या प्रमाणात हा आजार अनुवंशिकतेने होत असला, तरी प्रसूतीनंतर पहिल्या ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत हा आजार काही प्रमाणात महिलांमध्ये आढळून येतो.
लक्षणे जाणविल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा-
हा आजार मुळात हार्मोन्सशी निगडित असल्यामुळे यामध्ये अचानक वजन वाढते किंवा कमी होते. त्यामुळे अशी लक्षणे जाणविल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. या ग्रंथीमधून अनेक प्रकारचे हार्मोन्स स्रवतात. त्यांचा फायदा हृदय, स्नायू, मेंदू आणि अन्य अवयवाचे कार्य नीट राहावे, यासाठी होत असतो. विशेषकरून थायरॉइड हे आपल्या शरीरात बॅटरीचे काम करत असते. आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा यामधून मिळत असते. जर थायरॉइडमधून हार्मोन्स योग्य प्रमाणात स्रवली नाही, तर याचा आरोग्यावर परिणाम दिसून येतो.
थायरॉइड हा आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. बाह्य रुग्ण विभागात १० टक्के रुग्ण विभागात हे थायरॉइडचे असतात. या आजराचे निदान झाल्यानंतर त्यावर व्यवस्थित उपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य असते. मात्र, उपचार केल्यानंतर आपल्या मनाने औषध उपचार बंद करू नयेत. त्यामुळे त्रास होऊ शकतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. थायरॉइडच्या रुग्णांनी शक्यतो कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या खाऊ नये. - डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय.
हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते-
१) शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स योग्य प्रमाणात मिळाले नाही, तर हायपोथायरॉइडिझम आजार होतो. या रुग्णांना थकवा जाणवतो. या आजरामध्ये विशेष करून वजन मोठ्या प्रमाणात वाढते. चेहरा आणि पायांना सूज येते.
२) केस गळणे आणि भूक कमी होते. मोठ्या प्रमाणात आळस या रुग्णांना येतो. महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होते, तर गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. जर थायरॉइड ग्रंथी अतिक्रियाशील असेल, तर मात्र हायपर थायरॉइडिझम होतो. हृदयाच्या ठोक्यांची गती कमी अधिक प्रमाणात होत असते. दृष्टीवर अनेकवेळा बाधा येते.