Health Tips : कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ची आवश्यकता असते. आधुनिक जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक नागरिकांमध्ये सध्या ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शरीरामध्ये ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता असलेल्या व्यक्तींना कायम थकवा जाणवत असल्याची लक्षणे जाणवतात. त्यांना काम करताना उत्साह जाणवत नाही. शिवाय त्यांची हाडे कमजोर होतात.
सामान्यत: ‘व्हिटॅमिन डी’ चे विविध तीन प्रकार आहेत. शहरातील अनेक नागरिकांमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ चे प्रमाण खूपच कमी असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. यांमध्ये विशेष करून महिलांना थायरॉईड, केसगळती, हाडे ठिसूळ होणे, नैराश्य येणे यांसारख्या गोष्टी दिसून येतात. याकरिता काहीवेळ औषधरूपाने त्यांना ‘व्हिटॅमिन डी’ दिले जाते. ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता जाणून द्यायची नसेल तर त्यांना उत्तम जीवनशैलीचा वापर करणे गरजेचा आहे. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
फास्ट फूड खाण्याकडे वाढला कल-
१) कोणत्याही व्यक्तीला ‘व्हिटॅमिन डी’ हे काही खाद्यपदार्थ आणि सूर्यप्रकाशातून मिळत असतात. मात्र, अनेक नागरिक सूर्यप्रकाशात फिरताना दिसत नाही.
२) तसेच ज्या खाद्यपदार्थांतून मिळते ते पदार्थ खाल्ले जात नाही. कारण हल्ली जंक आणि फास्ट फूड खाण्याकडे बहुतांश व्यक्तींचा कल झालेला दिसून येतो.
३) त्यामुळे अनेक वेळा बरेच रुग्ण डॉक्टरांकडे थकवा येत असल्याची लक्षणे घेऊन जातात. त्यावेळी बऱ्याचदा डॉक्टर त्यांची ‘व्हिटॅमिन डी’ ची चाचणी करण्याचा सल्ला देतात.
४) त्यानंतर अनेकांच्या रक्तचाचणीत याचे निदान झाल्याचे दिसून येत आहे.
काय आहेत लक्षणे ?
‘व्हिटॅमिन डी’ हा शरीरातील हाडांसाठी महत्त्वाचा घटक असून, त्याचा शरीराच्या अन्य कामांसाठी उपयोग होत असतो. तसेच ज्यांना ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता असेल त्या लोकांना ५५ ते ६० वयानंतर ऑस्टियोपोरोसिस, हाडं तुटणे, फ्रॅक्चर होणे, हाडांमध्ये दुखणे हे आजार होत राहतात.
त्यासोबत अनेकवेळा काम करण्यास उत्साह नसणे मानसिक तणावाखाली असल्याचे दिसून येणे, सतत आजारी असल्यासारखे वाटत राहणे अशी लक्षणे शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ च्या कमतरतेमुळे असल्याची जाणवतात.
पाहायला गेल्यास ‘व्हिटॅमिन डी’ हे एका दिवसात मिळत नाही. ते उत्तम दिनचर्येच्या माध्यमातून मिळत असते. त्यासाठी सकाळी अर्धा तास उठून चालण्याची गरज आहे. संतुलित आहार घेण्याची गरज आहे.‘व्हिटॅमिन डी’चे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये संत्र्याचा रस, दूध आणि तृणधान्ये यांचा समावेश होतो. त्यामुळे या पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश करावा.
आपल्या शरीरातील दात, हाडे, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक प्रमाणात ‘व्हिटॅमिन डी’ची गरज असते. कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे ‘व्हिटॅमिन डी’ करते. त्यामुळे काही लक्षणे जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.