बदलती लाईफस्टाईल आणि स्पर्धेच्या युगात स्वत: ला टिकवून ठेवण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. धावपळीदरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळे स्ट्रेस येतो. अनेकदा आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र अशा प्रकारे दुर्लक्ष करणं हे महागात पडू शकतं. त्यामुळे स्टेस फ्री राहायचं असेल तर काही टिप्स आवश्यक आहेत. त्या टिप्स जाणून घेऊया.
दिवसाची सुरुवात प्रसन्न करा
स्ट्रेस फ्री जगायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने करा. सकाळी लवकर उठा. मोकळ्या वातावरणात जाऊन मूड फ्रेश करा. आरोग्यासाठी व्यायाम आणि नाश्ता महत्त्वाचा असल्याने तो वेळेत करा. सकाळी उठल्या उठल्या कामाचा ताण घेऊ नका. चांगली गाणी ऐका यामुळे शरिरात उत्साह येईल.
वेळेचे आणि कामाचे नियोजन करा
ऑफिसमध्ये खूप काम असल्याने त्याचा स्ट्रेस हा हमखास येतो. अनेकदा घरच्या काही समस्या देखील स्ट्रेससाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेळेचे आणि कामाचे नियोजन करा. असं केल्यास कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
प्रामाणिक राहा
काही जणांना खोटं बोलण्याची सवय असते. मात्र अनेकदा एक खोटं लपवायला खूप वेळा खोटं बोलावं लागतं. त्यातून पुढे काही न हाताळता येणाऱ्या समस्या देखील निर्माण होतात. तसेच स्ट्रेस निर्माण होतो. त्यामुळे खोटं बोलू नका. प्रामाणिक राहा. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही.
स्वत:साठी वेळ काढा
कामाच्या धावपळीत आपण स्वत: साठी वेळ काढायलाच विसरतो. आराम शरिरासाठी गरजेचा असतो. तुमच्या आवडी-निवडीसाठी वेळ काढायला हवा. सुट्ट्यांमध्ये कुठेतरी फिरायला जा. यामुळे स्ट्रेस कमी होण्यास नक्की मदत होईल.
पोषक आहार
कामात कितीही व्यस्त असलात तरी जेवण कधीच टाळू नका. जेवणाने आपल्याला पोषण मिळतं. पौष्टीक आहाराने मानसिक आणि शारीरिक रूपाने तुम्ही फिट राहता येतं. स्ट्रेस कमी होतो.संतुलित आहाराचं सेवन करा. नाश्ता आणि जेवण टाळून कोणतही काम करू नका. कारण यानेच तुम्हाला काम करण्यासाठी शक्ती मिळेल.
एकाच वेळी खूप काम करू नका
अनेकांना एकाच वेळी खूप कामं करण्याची सवय असते. मात्र असं करू नका कारण यामुळे एकही काम नीट होत नाही. शरीर आणि मन यामुळे एकाच ठिकाणी फोकस करत नाही त्यातूनच पुढे स्ट्रेस निर्माण होतो. हातातलं एक काम पूर्ण झाल्यावरचं दुसऱ्या गोष्टी पूर्ण करा. यामुळे स्ट्रेस येणार नाही.