Health Tips : तुम्हाला दूध पिणे पसंत असो अथवा नसो पण हे सर्वचजण मान्य करतात की, दूध सर्वात हेल्दी आणि पोषक तत्त्वांनी भरपूर असतं. कॅल्शिअम, प्रोटीन, आयोडीन, पोटॅशिअम, फॉस्फॉरस आणि व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषक तत्त्व भरपूर असलेल्या १ ग्लास दुधाने तुमची दिवसभराची पोषत तत्त्वांची गरज पूर्ण केली जाते. त्यामुळे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने रोज कमीत कमी १ ग्लास दूध घेणे आवश्यक मानले जाते. मात्र काही लोकांना थंड दूध पिणे पसंत असतं तर काही लोकांना गरम दूध पिणे पसंत असतं. पण यातील सर्वात चांगला पर्याय कोणता? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. thehealthsite.com या वेबसाइटला प्रसिद्ध डायटीशिअन नेहा चंदना यांनी याबाबत माहिती दिली.
गरम दुधाचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, हे सहजपणे पचन होतं. जर तुम्हाला लॅक्टोज पचायला जड जात असतील तर तुम्ही थंड दूध टाळायला हवं कारण ते तुम्हाला पचायला जड जाईल. तुम्ही थंड दुधाचा आनंद त्यात काही धान्याचे पदार्थ मिश्रित करून घेऊ शकता. गरम दुधामध्ये लॅक्टोज कमी होतात आणि यामुळे पोटदुखी, लूज मोशनसारख्या समस्या होत नाहीत.
गरम दूध प्यायल्याने येते चांगली झोप
जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधाचं सेवन करा. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचं एमिनो अॅसिड असतं, जे सेराटोनिन आणि मेलाटोनिन नावाचे केमिकल निर्माण करतात. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि चांगली झोप येते.
अॅसिडीटी दूर करण्यासाठी थंड दूध
जर तुम्हाला अॅसिडीटीची समस्या असेल तर थंड दूध फायदेशीर ठरू शकतं. अॅसिडीटीमुळे पोटात होणारी जळजळ देखील थंड दुधाने दूर होते. यासाठी जेवण केल्यावर अर्धा ग्लास दूध प्यायल्याने अॅसिडचं शरीरात होणारं उत्पादन नष्ट होतं. आणि अॅसिडीटीपासून तुम्हाला आराम मिळतो.
डिहायड्रेशन दूर करण्यासाठी थंड दूध
थंड दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. यासाठी सकाळी थंड दूध पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वात चांगली मानली जाते. जर तुम्हाला फ्लू आणि कोल्डची समस्या असेल तर मात्र थंड दुधाचं सेवन करू नये.
तर NBT च्या दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अनेक स्टडीजमधून हे समोर आलं आहे की, थंड दूध प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक दूध यासाठी पित नाहीत, कारण त्यांना वाटत असतं की, याने त्यांचं वजन वाढेल. मात्र थंड दुधामध्ये असलेल्या कॅल्शिअममुळे मेटाबॉलिज्मचा स्तरही वाढतो. त्यामुळे कॅलरीज वेगाने कमी करण्यास मदत मिळते.