>>मकरंद करंदीकर
भारतभर मकरसंक्रांतीला खास महत्व आहे. हा सण साजरा करण्याची प्रत्येक राज्यामधील तऱ्हा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात सुगड पूजन, वाण देणे, लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून तिळवण, बोरन्हाण, नवविवाहितेचे हलव्याचे दागिने घालून साजरे केले जाणारे हळदीकुंकू अशा अनेक गोष्टी मोठ्या हौसेने केल्या जातात. या सर्वांमध्ये काळ्या वस्त्राला फार महत्व असते. स्वामी अय्यप्पाचे भक्त तर काळे कपडे परिधान करूनच ४० दिवसांचे व्रत करतात. काळ्या कपड्यांमध्ये सूर्यकिरण म्हणजेच पर्यायाने उष्णता सर्वाधिक शोषली जाते. या काळात सर्वत्र खूप थंडी पडत असल्याने या उष्णतेची शरीराला खूप गरज असते. आहारातही तीळ, गूळ, ऊस, भुईमुगाच्या शेंगा इ उष्ण आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो.
तिळाच्या छोट्याशा दाण्यात काय काय सामावले आहे हे वाचले तर थक्क व्हायला होते. तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच सिसॅमिन व सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ पोषक घटक या तिळाच्या टीचभर दाण्यात असतात. सिसॅमिन व सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत.
अत्यंत महत्वाच्या घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे. एवढासा तीळ असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत ' १ तीळ ७ जणांनी वाटून खावा ' ही वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण रुजली असावी.
गूळ हा पदार्थही तसाच गुणी आहे. गुळामध्येदेखील व्हिटॅमिन बी ६, बी १२,आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस,प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. आपल्याकडील लोकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक द्रव्यांची कमतरता आढळते. म्हणूनच आपल्या अनेक धार्मिक कार्यांमध्ये, व्रतांमध्ये नैवेद्यासाठी चणे गूळ, पुरण, पुरणपोळी, गुळपोळी असे पदार्थ आवर्जून वापरले जातात. प्रसाद म्हणून नंतर ते खाल्ले जातात.
( तिळाची पोषणमूल्ये संदर्भ : प्रा. मीनाक्षी भट्टाचारजी, राईस युनिव्हर्सिटी, ह्यूस्टन,टेक्सास, यांचा लेख )