Health tips : आपल्या आजुबाजुला तुम्ही पाहिलं तर काही लोकांना अगदीच छोट्याशा कारणावरून राग येतो. काहीजण तर आपला राग विनाकारण कोणावरही काढत असतात. राग ही एक मानवी स्वभावाची मुलभूत भावना समजली जाते. माणसाला राग येणं हे नैसर्गिक आहे पण त्याचा अतिरेक मात्र नको. विनाकारण चिडचिड होणं तसेच छोट्या-छोट्या कारणावरून राग येणं त्याचा नकळतपणे आपल्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होण्यामागचं देखील हेच कारण आहे. राग आल्यामुळे माणसाची भावनिक स्थिती विस्कळीत होऊन त्याच्या इतर गोष्टींवर याचा वाईट परिणाम जाणवतो. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीरामध्ये असलेल्या जीवनसत्व तसेच खनिजांच्या अभावामुळे माणसाला लगेच राग येतो. याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
वारंवार राग येणं ही सवय मानवी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. त्यामुळे शरीरातील एड्रेनालाईनसह कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते. त्यासोबतच ब्लड प्रेशर तसेच ह्रदयरोगाचा धोका देखील संभावतो. वेळोवेळी प्रसंगानुसार माणसाला राग येत असेल तर त्यामागे शरीरातील काही पोषक तत्वांची कमतरता हे प्रमुख कारण आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मॅग्नेशिअमची कमी-
सर्वात शांत खनिज म्हणून मॅग्नेशिअमला ओळखलं जातं. या खनिजामुळे मानसिक संतुलन सुधारते. शरीरातील मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे चिडचिड, चिंता तसेच ताण-तणाव वाढतो. ज्याचं रुपांतर रागाच्या भावनेत होतं. नको त्या गोष्टींवर रिअॅक्ट होणं तसेच बडबड करणं ही मॅग्नेशिअमच्या कमतरतेची लक्षणे मानली जातात.
व्हिटॅमीन डी चा अभाव-
मानवी शरीरात व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळे अनेक बदल घडून येतात. याचा संबंध ड्रिप्रेशन तसेच एन्जायटीसोबत जोडण्यात आला आहे. या स्थितीमध्ये माणसाला प्रचंड राग येतो.
झिंक-
मानसिक स्वास्थासाठी सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे झिंक. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला नैराश्य येत असेल तर ही झिंकची कमी असण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे मेंदुची कार्यप्रणाली बिघडू शकते. शरीरामध्ये न्यूरोट्रांसमीटर तसेच हार्मोनल प्रक्रियेसाठी झिंकची गरज असते. शरीरात झिंकची कमतरता असल्यास वारंवार मुड खराब होतो.
ओमेगा- ३ फॅटी अॅसिडची कमी-
ओमेगा-३ फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे ओमेगा-३ चा अभाव असल्यास मुड खराब राहतो. त्यामुळे बारीक सारीक कारणांमुळे आपल्याला राग येतो. ओमेगा-३ मुळे कार्यक्षमतेत सुधारणा होते आणि मुड नेहमीच सकारात्मक राहतो.
या सर्व कमतरता भरून काढण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. राग नियंत्रित करण्यासाठी आहारात झिंक, मॅग्नेशिअम तसेच ओमेगा- ३ ची कमतरता भरून काढणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.