Health Tips : आकडी येणं म्हणजेच एपिलेप्सी, ज्याला फिट येणे, फेफरे, मिरगी, अपस्मार ही सुद्धा नावं आहेत. वेगवेगळ्या वयोगटांत आकडी येण्याची कारणंही भिन्न असतात. लहान मुलांच्या मेंदुचा विकास योग्य पद्धतीने न झाल्यास आकडी येण्याची समस्या उद्भवू शकते. तर वयस्क माणसांना अतिविचार, ब्रेन ट्यूमर या कारणांमुळे फिट येते. शिवाय त्यामागे अनुवांशिक कारणेही असतात. साधारणत: फिट येणं किंवा आकडी येणं ही एक मेंदूची व्याधी आहे, आणि उपचारांनी ही व्याधी व्यवस्थित आटोक्यात राहू शकते. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आकडी येणं ही एक कॉमन समस्या आहे. या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येतो. त्यामुळे रुग्ण आपली शुद्ध हरपून बसतो. आकडी येणाऱ्या रुग्णाला यामुळे असंख्य अडचणींचा सामना काराव लागतो. बऱ्याचदा आकडी आलेल्या माणसाची दातखिळी देखील बसते. तसेच शुद्ध हरपल्यामुळे तो रुग्ण जमिनीवर कोसळतो. अशा घटना आपल्या कानावर आल्यात असतील. त्यामुळे आकडी येणाऱ्या रुग्णाकडे कायम लक्ष ठेवून राहावं लागतं.
लक्षणे -
एखाद्या व्यक्तीला आकडी आल्यास ती व्यक्ती लगेचच बेशुद्ध पडते, त्वचा सुन्न पडणे ,शरीरात झटका येणे,विचार करण्याची क्षमता कमी होणे, तोंडाला फेस येणे प्रामुख्याने आकडी येण्याची ही मुख्य लक्षणे आहेत.
कारणे-
मानसिक तणाव, बदलती जीवनशैली तसेच मेंदूला इजा झाली असल्यास किंवा ब्रेन स्ट्रोक, ट्यूमर आणि उच्च रक्तदाब यामुळे आकडी येण्याची संभावना वाढते.
उपाय-
हेल्थ एक्सपर्टनुसार, वारंवार फिट येत असल्यास या आजारासाठी वेगवेगळ्या वयोगटातील रुग्णांसाठी वेगळी उपचार पद्धती आहे. काही रुग्ण वेळेवर औषधे गोळ्यांचे सेवन केल्यामुळे बरे होतात. तसेच गोळ्या औषधांचे सेवन करून ज्या रुग्णांना गुण येत नाही त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्यांची शारिरिक तपासणी करत वेगवेगळ्या चाचण्या करून याचे निदान केले जाते.