फक्त शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या शेंगांच्या झाडाचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे सूज दूर होते. याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. आयुर्वेदामध्येही शेवग्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामध्ये प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स यांसारखी तत्व आढळून येतात. ही तत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
खरं तर शेवगा हा निसर्गतःच उष्ण असतो. त्यामुळे याचा वापर वात आणि सर्दी-कफ यांसारख्या विकारांवर करण्यात येतो. शेवग्याच्या शेंगा, पानं, झाडाची मूळं यासर्वांमध्ये पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्यांवर शेवगा गुणकारी ठरतो. जाणून घेऊया यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत..
1. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी
शेवग्याच्या पानांचा वापर सर्वात जास्त करण्यात येतो. यामध्ये पालकच्या भाजीपेक्षा 3 पटींनी आयर्नचं प्रमाण अधिक असतं. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जर तुमच्या शरीरातील रक्त कमी झालं असेल तर आहारात याचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
2. अल्सर, ट्यूमर, ब्लड प्रेशर यांसाठी लाभदायक
शेवग्याची पानं शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करतात. तसचे अल्सर ठिक करण्यासाठी, ट्यूमर रोखण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासठी आणि शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो.
3. रक्त शुद्ध होतं
शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीरात अॅन्टीबायोटिक एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अॅक्नेचा त्रास, त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
4. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी
शेवग्याच्या शेंगांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी डायबिटीज नियंत्रणात राहतं. तसेच पित्ताशयाचे कार्यही सुरळीत होते. त्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
5. श्वसनाचे विकार कमी
घशातील खवखव, कफ, सर्दी, श्वास घेताना त्रास होणं यांसारख्या समस्यांचा त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावं. यामधील पोषक तत्व श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच टीबी, ब्रोन्कायटीस, अस्थमा यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उपाय म्हणून मदत करतात.
6. डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी
शेवगा व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनता भंडार आहे. हे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. डोळ्यांच्या विकारांमुळे कमी दिसणं, धुसर दिसणं यांसारख्या समस्या दूर होतात.
7. कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करतं
खराब जीवनशैली आणि सतत केलं जाणारं जंक फूडचं सेवन यांमुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. ज्यामुळे हृदयाशी निगडीत अनेक समस्या होऊ शकतात. असं सांगण्यात येतं की, दररोज शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.