'माती खाणे' हा शब्द प्रयोग आपण बोलीभाषेत वापरतो. नुकसान होणे, चुका होणे या अर्थाने तसे म्हटले जाते. परंतु या लेखात आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून शब्दशः 'माती' खाण्याचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.
प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. अशातच गर्भवती महिलेचे डोहाळेदेखील मोठे गमतीदार असतात. कोणाला माती खावीशी वाटते तर कोणाला मुंगळे, किडे किंवा इतर काही! गर्भारपणात अशा इच्छा उत्पन्न झाल्यावर आपसुख गर्भावरही त्याचा परिणाम होतो. येणाऱ्या बाळाच्या आवडी निवडीची त्यात भर पडते. अशीच एक सवय आहे माती खाण्याची!
मातीत खेळणाऱ्या मुलांना मातीची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. त्यात समज नसल्यामुळे ते दिसेल ती वस्तू तोंडात टाकतात. मातीत चांगले गुणधर्म जेवढे असतात, तेवढेच शरीराला अनावश्यक असणारे घटकही असतात. याबाबत डॉ. भोरकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
माती खाण्याचं व्यसन हानिकारक :
आपण सगळे जण मातीवर प्रेम करतो. मातीतून आपल्याला अन्न मिळतं. मातीपासून वेगवेगळ्या वस्तु तयार करतो. पण मातीतून नशाही येते असं म्हटलं तर? हो, हे खरं आहे. अलीकडे काही महिला, लहान मुलांना, तरुणवर्ग व वृद्धांना माती खाण्याचं व्यसन लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आज-काल नागरिक या मातीचं व्यसन करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. खाण्यासाठी मातीची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. आर्श्चर्य म्हणजे ही माती चक्क सहज उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे माती खाणाऱ्यांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे.
वैद्यकीय दृष्ट्या माती अधिक प्रमाणात व दीर्घकाळ सेवनाचे दुष्परिणाम :
मातीमध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक म्हणजे २१. २५ टक्के आहे. सामान्यतः मानवी शरीरात कॅल्शियमचं प्रमाण ८.५ ते १०. २ मायक्रो ग्रॅम / पार्ट असते. माती प्रमाणापेक्षा अधिक सेवनाने व दीर्घकाळ सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. अर्थात सेवन करणाऱ्याच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण प्रचंड वाढल्याने त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊन किडनीची कार्यक्षमता कमी होते. शिवाय तहान खूप लागते व परत परत लघवीला जावं लागतं. तसेच भुकेवर परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते. अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडांवर देखील परिणाम होऊ शकतो. कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊन अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशन येणे तर हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन हृदयगती कमी जास्त होणे, हृदय गतीवरील नियंत्रण सुटणे असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. एकंदरीतच कॅल्शियम अतिप्रमाणात सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकतं.
हे व्यसन सोडवण्यासाठी पुढील उपाय करून पहा :
>>केळं आणि मध एकत्र करुन सेवन करा. यामुळे माती खाण्याची सवय सुटण्यास मदत होईल.
>>झोपण्यापूर्वी गरम पाणी आणि ओवा याचे सेवन करा, त्यामुळे मातीची तलफ कमी होईल.
>>रोज दिवसभरात एक तरी लवंग खा किंवा झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंगीची पूड टाकून ते पाणी प्या.
>>विशेषतः कॅल्शिअमच्या अभावी ही सवय लागू शकते, त्यामुळे आहारात जास्तीत जास्त कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा समावेश करा!