अनेकांना गोड खायला आवडतं, पण हे गोडं खाणं महागात पडू शकतं. कारण साखर ही तुमच्या आरोग्याची खरी शत्रू आहे. जास्त साखर खाल्ल्याने अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. साखर सायलेंट किलर ठरत आहे. साखरे जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास वजन वाढणं, डिप्रेशन, हृदयविकार, त्वचा खराब होणे, डायबेटीस, कॅन्सर, स्मरणशक्ती कमी होणं, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, कॅविटी आणि ऊर्जेची कमतरता यासारखे आजार होऊ शकतात.
साखरेच्या साईड इफेक्ट्सबाबत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) आणि ICMR ने प्रथमच सॉफ्ट ड्रिंक, ज्यूस, कुकीज, आईस्क्रीम, सेरियल्स, पॅकेज्ड फूड्स आणि ड्रिंक्स यामध्ये साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे.
साखर खाणं किती धोकादायक?
ICMR ने 13 वर्षांनंतर खाण्यापिण्याशी संबंधित काही सूचना बदलल्या आहेत. आता बाजारात विकल्या जाणाऱ्या साखर उत्पादनांची तपासणी FSSAI आणि इतर अन्न नियामक संस्थांच्या जबाबदारीत आली आहे. साखरेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर सर्वच संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. याच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, डायबेटीस आणि कॅन्सर होऊ शकतो. हार्वर्ड हेल्थच्या मते, जास्त साखर खाल्ल्याने हार्ट डिसीज आणि ब्लड प्रेशर यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
मुलांच्या खाण्यापिण्यात असते जास्त साखर
लहान मुलांच्या जेवणासाठी जी उत्पादने बनवली जातात ती केवळ भारतीयच नाही तर परदेशी कंपन्यांमध्येही तयार केली जातात. त्यामध्ये जास्त साखर असते. याबाबत अनेक रिपोर्ट आले आहेत, परंतु अद्याप कंपन्या त्याचं गांभीर्याने पालन करत नाहीत. बहुतेक ब्रँडेड खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्सने त्यांच्या फॉर्म्युलेशनमध्ये बदल करणं आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने ग्लुकोज 6-फॉस्फेट (G6P) मध्ये वाढ होऊ शकते, जी मुख्यतः हृदयाच्या स्नायूंच्या प्रथिनांमधील बदलांसाठी जबाबदार आहे. यामुळे आजार उद्भवू शकतात.
दररोज नेमकी किती साखर खावी?
अमेरिकन हार्ट असोसिएशनने सल्ला दिला आहे की, पुरुषांनी एका दिवसात 150 कॅलरीज म्हणजेच 36 ग्रॅम पेक्षा जास्त साखर खाऊ नये, तर महिलांसाठी हे प्रमाण 100 कॅलरीज म्हणजेच 24 ग्रॅम आहे. यापेक्षा जास्त साखर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.