अनेकदा काही लोक शिंक आल्यावर ती जबरदस्तीने रोखण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती शिंक रोखण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला. नाक आणि तोंड बंद करुन शिंक रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या घशात झिणझिण्या आल्या आणि त्याचा घसा सूजला. शिंक रोखण्याचा प्रयत्न केल्यावर या व्यक्तीला गिळण्यास त्रास होऊ लागला आणि नंतर त्याचा आवाजा गेला. ब्रिटनच्या लिसेस्टर यूनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी या व्यक्तीवर उपचार केले. सात दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्याच्या काही अडचणी कमी झाल्या. डॉक्टरांनी सांगितले की, नाक आणि तोंड बंद करुन शिंक रोखणे किंवा दाबणे फार धोकादायक आहे आणि असं करणं टाळलं पाहिजे.
हवेचा दबाव रोखणं धोकादायक
खरंतर जेव्हा आपण शिंकतो तेव्हा ८० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हवा आपल्या शरीराबाहेर येते. पण हवेच्या या प्रेशरला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करता तेव्हा शिंकेतून निघणारी हवा शरीरात अडकून राहते आणि याने शरीराला नुकसान होतं. वेगवेगळ्या अंगांवर याचा दबाव पडून त्रास होऊ शकतो.
छातीपर्यंत आली होती हवा
शिंक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा असे लक्षात आले की, त्याने शिंक रोखल्यावर त्याचे बुडबुडे व्यक्तीच्या छातीपर्यंत गेले होते. अशात त्याला इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका होता. त्यामुळे त्याला इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी रुग्णालयात ठेवून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
फुफ्फुसांना होतं नुकसान
अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस हेल्थ सायन्स सेंटरच्या हेड अॅन्ड नेक सर्जन डॉ. जी यांग जियांग म्हणाले की, 'हे विचित्र आहे पण सत्य आहे. शिंक रोखल्याने तुम्हाला तितकाच त्रास होतो, जितका तुम्हाला मानेत एखादी जखम झाल्याने होतो. इतकेच नाही तर शिंक जबरदस्तीने रोखण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या फुफ्फुसालाही याचा मोठा त्रास होऊ शकतो.
जोरात शिंकणे फायदेशीर
आपल्याला शिंक येते म्हणजे याचा उद्देश शरीरातून एखाद्या प्रकारचा वायरस किंवा बॅक्टेरिया बाहेर काढणे आहे. अशात जर तुम्ही शिंक जबरदस्तीने रोखाल तर हवेचं प्रेशर शरीराच्या एखाद्या नाजूक भागात जाऊन नुकसान करु शकतं. त्यामुळे ही समस्या होऊ नये यासाठी जोरात शिंकणे हाच एक चांगला पर्याय आहे.
आपल्याला शिंका येणे ही गोष्ट तशी फार कॉमन आहे. शिंका कधीही येतात मग आपण ऑफिसमध्ये असलो किंवा घरी असलो काय. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आपण शिकांनी हैराण होतो. शिंका येण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तर अॅलर्जीमुळेही शिंका येतात. सटासट शिंका येऊन गेल्यानंतर जरा कुठे बरे वाटते.
शिंका का येतात?
शिंका आपल्या श्वसननलिकेला साफ ठेवण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा श्वसनात अडथळा निर्माण करणारे घटक श्वसननलिकेत अडकतात. त्यावेळी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतूना संदेश पाठवतात. यावेळी आपली फुफ्फुसे जास्त प्रमाणात ऑक्सिजन साठवतात आणि ते घटक शिंकेमार्फत बाहेर फेकले जातात.