प्रत्येक ऋतूचा शेवटचा आठवडा आणि पुढल्या ऋतूचा पहिला आठवडा हा पंधरवडा ‘ऋतुसंधी’ या नावाने ओळखला जातो. ‘ऋतुसंधी’त वातावरणात बरेच बदल घडत असतात. शरद ऋतू सुरू होत आहे. त्यात पावसाळा संपायचे नाव घेत नाहीये. अशात विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ.
पावसाळा जितका आल्हाददायक वाटतो, तेवढाच कडक असतो ऑक्टोबर महिन्यातला उन्हाळा! त्यालाच आपण ऑक्टोबर हिट असेही म्हणतो. मात्र सद्यस्थिती पाहता आगामी पंधरा दिवसात उन्हाळा असेल की पावसाळा की हिवाळा? याबद्दल निश्चित माहिती देता येणार नाही. परंतु वातावरणातील हे बदल मानवी शरीराला त्रासदायक ठरू शकतील. ऋतुसंधीचा हा काळ आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याबाबत वैद्य परीक्षित शेवडे यांनी समाज माध्यमावर माहितीपर एक पोस्ट केली व त्यात पुढचे पंधरा दिवस सावध राहा असा इशाराही दिला आहे.
आरोग्याची काळजी: ते लिहितात, 'वर्षा ऋतूमधून शरद ऋतूत वाटचाल होण्याचा काळ म्हणजे ऋतुसंधी. या काळात, म्हणजेच पुढच्या पंधरा दिवसांत दमा, सांधेदुखी, आमवात, अम्लपित्त, शीतपित्त, पचनाचे ज्ञात त्रास बळावू शकतात. तसंच, कोणतीही साथ असल्यास संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे.'
उपाय : हे दुखणी टाळण्यासाठी नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार (उदा : दूध आणि आंबट पदार्थ पाठोपाठ खाणे), मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळले पाहिजेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. '
शरद ऋतूची सुरुवात आणि नवरात्रारंभ एकाच दिवशी येत असल्याने आपल्या पूर्वजांनी पहिल्या नऊ दिवसांत अनेक प्रकारचे पथ्य पाणी सांगितले आहे. ही व्यवस्था केवळ आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही किती महत्त्वाची आहे, हे यावरून लक्षात येते.