तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अलीकडे ट्रेंड म्हणून घरोघरी तांब्याच्या भांड्यांचा वापर केलेला दिसतो. पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने हा वापर केला जाई. सद्यस्थितीत तांब्याची भांडी पुनर्वापरात आली आहेत, याचा आनंदच आहे. पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात. म्हणूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण डॉ. अमित भोरकर यांच्या लेखणीतून जाणून घेऊ.
>> ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले तसेच स्वच्छ असायला हवे.
>> तांब्याच्या भांड्याच्या आत मधल्या आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूने तांबे वापरलेले हवे कुठलाही दुसरा धातू त्यामध्ये मिक्स नसावा.
>> भांडे स्वच्छ घासून घेतलेले असावे. भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करू शकता.
>> तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे पाण्याचे ऑक्सिडेशन होते व भांड्याच्या आत मधल्या बाजूस एक लेयर जमा होते, स्वच्छ करणे खूप गरजेचे असते.एखादे भांडे आत मधून स्वच्छ करता येत नसल्यास जसे की तांब्याची बॉटल,ज्यामध्ये आपला हात जात नाही व आपण त्या बॉटलची स्वच्छता व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळे सहसा अशी भांडी वापरणे टाळावे.
>> तांब्याच्या भांड्यात कधीच उकळलेले पाणी, जास्त गरम पाणी टाकू नये. पाणी उकळलेले असेल तर ते आधी थंड होऊ द्यावे व नंतर ते तांब्याच्या भांड्यात टाकावे.
>> लिंबू सरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण हे ऍसिडिक असतात. ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि ऍसिडिक पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होते. दही,आचार या गोष्टी सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवू नये तसेच आंबट पदार्थ भांड्यामध्ये शिजवू नये.
>>अति सर्वत्र वर्जयत् | म्हणजेच कुठलीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे नुकसान होतात. म्हणून आपली प्रकृती,वातावरण,तहान,आजार, आजाराची अवस्था या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन मगच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
>>रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये काही दिवस पाणी प्यायल्या नंतर काही दिवसाचा गॅप ठेवावा.