संधीवाताचा त्रास पूर्वी ज्येष्ठ लोकांना व्हायचा. अलीकडे अगदी लहान मुले, तरुणसुद्धा संधिवाताच्या त्रासाने ग्रस्त असल्याचे आढळते. त्याला जबाबदार आहे चुकीची जीवनपद्धती आणि व्यायामाचा अभाव. हा त्रास कशाने होतो आणि कसा दूर करता येतो याबद्दल डॉ. भोपकर यांनी दिलेली माहिती पाहूया.
संधिवात:- संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात त्यामुळे गुडघ्यामध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते.
सांधेदुखीची कारणे:-
>>साधारणतः साठ वर्षानंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येतो.
>>मात्र अलीकडे तरुणांनाही हा त्रास होत असल्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले वजन. वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार हा गुडघ्यावर, खुब्याच्या सांध्यावर पडत असतो.
>>व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते.
>>हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो.
>>दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते.
>>शरिरातील संप्रेरकातील (हार्मोनल) बदल, रजोनिवृत्ती यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता अधिक असते.
संधिवाताचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे?
- संतुलित आहार घ्यावा
- लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवणे
- नियमित व्यायाम, योगासने करावीत, चालणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम करावेत.
- हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ड जीवनसत्त्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.
- आयुर्वेदिक उपचार अधिक लाभदायी ठरतात.