HEALTH : फॅशनचा आरोग्यावर विपरित परिणाम !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2017 10:53 AM
आपणही अतिशय घट्ट (स्किनी) जीन्स, हँड बॅग्ज, जास्त वजनाचे दागिने आणि उंच टाचेच्या चपला (हाय हिल्स) यांचा वापर करताय का?
हल्ली फॅशनचा ट्रेंड एवढा वाढला आहे की, लहानांपासून मोठ्यांपर्यत तसेच पुरुष असो की महिला सर्वचजण स्टायलिश दिसण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र ही स्टाइल आपणास महाग पडू शकते. नुकतेच ब्रिटिश कॅरोप्रॅक्टिक असोसिएशनने (बीसीए) केलेल्या सर्वेक्षणात हे सिद्ध झाले आहे.सर्वेक्षणानुसार, अतिशय घट्ट (स्किनी) जीन्स, हँड बॅग्ज, जास्त वजनाचे दागिने आणि उंच टाचेच्या चपला (हाय हिल्स) याचा आपल्या शरीरावर चक्क वाईट परिणाम होतो, असे आढळले आहे. अत्यंत घट्ट जीन्स आणि मोठं हूड असलेला कोट घातला, तर आपली काम करण्याची क्षमता कमी होते. याचा आपलं उठणं-बसणं आणि चालण्यावरही परिणाम होतो. उंच टाचेच्या चपला सांध्यांवर परिणाम करतात. यामुळे उडी मारण्यावर आणि पायी चालण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आपली चाल मंदावते आणि उंच टाचेच्या चपला सातत्यानं वापरल्यानं आपल्याला जोरात उडीही मारता येत नाही. बीसीएच्या म्हणण्यानुसार, स्त्रियांच्या वाढत्या पाठदुखीचं कारण त्यांच्या मोठमोठ्या बॅग्ज आहेत. मोठी, वजनी सॅक घेऊन किंवा लॅपटॉप बॅग घेऊन आॅफिसला रोजचं जाणं-येणं केलं, तर त्यामुळे खांद्यांवर जास्त दाब पडतो. त्यामुळे खांदेदुखी आणि पाठदुखी दोन्ही सुरू होते.अनेकदा स्त्रिया आपल्या पेहरावानुसार बऱ्यापैकी वजनी दागिनेही वापरतात. त्यामुळेही त्यांना पाठदुखी सुरू होते. मान आणि गळ्यावरही या वजनी दागिन्यांचा ताण येतो आणि मानेचं दुखणं सुरू होऊ शकतं किंवा असलेलं वाढूही शकतं. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास एक तृतीयांश स्त्रियांना या सर्वच गोष्टींबद्दल फारशी कल्पनाच नव्हती. या सर्वेक्षणानंतर मात्र या संपूर्ण पेहराव आणि अॅक्सेसरीजविषयी पुनर्विचार करणार असल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांनी सांगितलं.