- डॉ. नेहा पाटणकर
'थीन-फॅट इंडियन'... दोन विरुद्धार्थी शब्दांनी बनलेली ही संज्ञा थोडी वेगळी वाटेल. पण, ती अत्यंत नेमकी टर्म आहे आणि तितकीच काळजीचीही आहे. म्हणूनच तिचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. 'बीसीए' म्हणजेच बॉडी कम्पोझिशन अॅनालिसिस करताना ही संज्ञा मला भेटली.
त्याचं झालं असं की, जयश्री खूप दिवसांपासून वजन कमी करायला क्लिनिकला यायचं म्हणत होती. पण मुहूर्त सापडत नव्हता. वुमन्स डे स्पेशलसाठी तपासण्या झाल्या. तेव्हा, साखरेने खूपच वरची पातळी गाठल्याचं तिच्या लक्षात आलं आणि मग वजन आणि साखर एकत्रच कमी करण्यासाठी ती क्लिनिकमध्ये धडकली. तिला मानसिक आधार देण्यासाठी तिची मैत्रीण मनीषाही सोबत आली होती.
वजन, उंची तपासून बीसीएचा रिपोर्ट जयश्रीच्या हातात आला. जयश्रीच्या स्नायूंच्या वजनाच्या दुप्पट तिच्या फॅट्सचं वजन असल्याचं या रिपोर्टमधून लक्षात आलं. हा रिपोर्ट पाहून मनीषाचीही उत्सुकता ताणली गेली. 'मीही बीसीए चाचणी करून घेतली तर चालेल का?', तिने विचारलं. त्यावर जयश्री वैतागली. 'तू कुठे जाड आहेस, तुझा कशाला हवा बीसीए वगैरे?' त्यावर मनीषा म्हणाली, 'माझेही हल्ली पाय दुखतात, थकायला होतं आणि सारखी तहान लागते. यामागचं कारण या रिपोर्टमधून कळू शकेल.'
त्यानंतर, आम्ही तिचा बीसीए रिपोर्ट केला. गंमत म्हणजे, मनीषाच्या रिपोर्टमध्ये एकूण वजन सर्वसाधारण होतं, पण तिच्या स्नायूंचं वजन खूपच कमी निघालं. तिच्या फॅट्सचं वजन तिच्या स्नायूंच्या वजनाच्या जवळजवळ दीडपट आलं. म्हणजेच मनीषा बारीक दिसत असली तरी 'अंदर की बात' काहीतरी वेगळंच सांगत होती. ती 'थीन-फॅट इंडियन' होती. कारण ती बाहेरून बारीक आणि आतून जाड होती. म्हणजेच, तिच्या शरीरातील फॅट्सचं वजन जास्त होतं.
मनीषाचा पाय दुखणं किंवा खूप थकवा येणं किंवा सारखं तहान लागणं हे कॅल्शियम कमी झाल्यामुळे किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे असू शकत होतं. परंतु, अशीच काही लक्षणं प्री-डायबेटिसचीही असू शकतात. म्हणजेच, डायबेटिस होण्याच्या आधीचा हा प्रकार असू शकतो. मनीषा बारीक दिसत होती, म्हणजेच तिच्या अंगावर त्वचेखाली फॅट्स जमा होत नव्हती. व्यायाम कमी झाल्यानंतर पोटावर थोडीशी फॅट्स जमा झाली होती, पण रिपोर्टमध्ये दाखवलेली फॅट्स कुठे जमा झाली होती, हा प्रश्न मनीषाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हीच ती 'अंदर की बात'च्याही 'अंदर की' अतिशय महत्त्वाची बात म्हणजेच 'व्हिसरल फॅट्स'.
आपलं 'व्हिसरल फॅट' म्हणजेच आपल्या महत्त्वाच्या अवयवांच्या भोवतालचं - यकृत, हृदय, स्वादुपिंड किंवा मूत्रपिंडाभोवती साठून राहिलेलं फॅट्स. ही फॅट्स खूपच धोकादायक. कारण हार्मोन्सच्या कार्यप्रणालीवर त्याचा परिणाम होतो. ही फॅट्स अवयवांना गुदमरून टाकतात. इन्शुलिन पाझरण्याच्या स्वादुपिंडाच्या क्रिया बिघडू शकते किंवा यकृताची शरीराला साखर पुरवण्याची जी ताकद असते तीही कमी होते.
व्हिसरल फॅट्सचं प्रमाण बीसीएमध्ये आपल्याला कळतं, पण ते कुठल्या अवयवाभोवती आहे हे मात्र सोनोग्राफी, सीटी किंवा एमआरआयमधूनच कळू शकतं.
ही व्हिसरल फॅट्सची 'अंदर की बात' आपल्या भारतीय लोकांमध्ये जास्त पाहायला मिळते. ज्याचं फॅट्स अंगावरती दिसतं त्यांना स्वतःलाही आपल्याला डायबेटिस होण्याचा धोका आहे, याची कल्पना असते. पण हे दिसायला बारीक; तरीही आतून जाडे लोक - म्हणजेच ज्यांच्या स्नायूंच्या तुलनेत फॅट्स जास्त असतो, अशांनाही डायबेटिसचा धोका असतोच. 'अरे, तो तर जाड नाही, तरी डायबेटिस कसा झाला?', असा प्रश्न आपण ऐकतो. त्याचं कारण व्हिसरल फॅट्स असू शकतं. आपल्याकडे डायबेटिस होण्याचं प्रमाण युरोपीयन किंवा अमेरिकन लोकांपेक्षा जास्त दिसतं. लहान चण आणि चलनवलन, व्यायामाचं प्रमाण कमी असल्याने आपण डायबेटिसच्या जाळ्यात अधिक प्रमाणात ओढले जातो.