HEALTH : उन्हाळ्यात ‘गॉगल’ का व कोणता वापरावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2017 9:26 AM
आपण खरंच डोळे उघडे ठेवून गॉगल घेतो का? घेतलेला गॉगल आपल्या डोळ्यांना किती योग्य आहे, याची खात्री कधी केली आहे का?
-Ravindra Moreआज फॅशनचा ट्रेंड सुरु असून स्टायलिश राहणे कोणाला आवडणार नाही. त्यातच तरुणाईचं स्टाईलमध्ये राहण्याचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे ‘गॉगल’ होय. प्रत्येकजण त्याच्या आवडीप्रमाणे गॉगल घेतो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर या स्टाईलला जणू उधाणच येतं. काहीजण तर दर महिन्याला गॉगल बदलतात. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खरंच डोळे उघडे ठेवून गॉगल घेतो का? रस्त्याच्या कडेला दिसणारे अगदी कमी किमतीचे स्टायलिश गॉगल आपण सहज विकत घेता. हे स्वस्तातील गॉगल आपल्या डोळ्यांना किती महाग पडू शकतात याची जाणिव तरी आपणास असते का? जरी आपण महागड्या दुकानावर गॉगल घेतला असेल, मात्र तोे आपल्या डोळ्यांना किती योग्य आहे, याची खात्री कधी केली आहे का? का घ्यावा गॉगल?बहुतांश लोक गॉगल फक्त स्टाइलसाठी घेत असतात. शिवाय प्रवासादरम्यान किंवा बाहेर फिरताना डोळ्यात कचरा जाऊ नये, सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचे सरंक्षण व्हावे हेदेखील गॉगल घेण्यामागचे कारण असू शकते. मात्र बरेच लोक गॉगल वापरतच नाही. खरं सांगायचे झाले तर डोळ्यांच्या सरंक्षणासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गॉगल वापरायलाच हवा. बहुतेकजण दिवसभर उन्हातच असतात. त्यातील प्रवास करणाऱ्याची संख्या जास्त आहे. बाहेर फिरताना सूर्याच्या किरणांचा मारा आपल्या चेहऱ्यावर तसेच डोळ्यांवर होत असतो. सूर्याच्या किरणांमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडियेशन असल्याने याचा परिणाम त्वचेवर होऊन अनेक समस्या निर्माण होतात. डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये सुरकूत्या पडतात, त्या सूर्याच्या अतिनिल किरणांमुळेच. म्हणून आपल्या डोळ्यांना या अतिनिल किरणांपासून वाचविण्यासाठी गॉगल वापरणे आवश्यक असते. गॉगल कोणता वापरावा?रस्त्यावरचे स्वस्त गॉगल तर मुळीच घेऊ नयेत, ते आपल्या डोळ्यांना महाग पडू शकतात. शिवाय दुकानातून घेताना १०० टक्के अतिनिल किरणांपासून सुरक्षित असे लेबल असलेलाच गॉगल घ्यावा. काही वेळेस महागडे गॉगल्सवर असे लेबल नसते. १०० टक्के अतिनिल किरणांपासून सुरक्षित असलेला गॉगल सर्व प्रकारच्या अतिनिल किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करतो. म्हणून डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशाच गॉगलचा आग्रह धरावा.