जगभरात जवळपास अडीच लाख लोक आदल्या रात्री झोपतात परंतु दुसऱ्या दिवशीही सकाळ बघू शकत नाहीत. कारण झोपेतच त्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू होतो. त्या अडीच लाखांमध्ये आपला क्रमांक लागला नाही, याहून मोठा आनंद दुसरा कोणत्या गोष्टीचा असू शकतो का? ही गोष्ट एखाद्या उत्सवातून कमी नाही. हा उत्सव कसा साजरा करायचा? तर सकाळी उठल्यावर छोटेसे स्मित करून! मात्र मुख्य समस्या हीच आहे, की आजच्या तणावयुक्त जगात आपण हसणे विसरलो. विषय, विचार, विकार आपल्यावर एवढे हावी झाले आहेत की आपण रात्री शांत झोपूही शकत नाही.
आपला शेवट कसा घडणार आहे माहीत नाही, फक्त मागच्या २४ तासांचा विचार करा. आपण शय्येवर नाही तर मृत्यू शय्येवर बसलेलो आहोत असे समजा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. जर तुम्ही दिवसभरात कोणाशी खोटेपणाने वागला नसाल, कोणाला दुखावले नसेल, कोणाला फसवले नसेल, तर तुम्हाला पुढच्या दिवसाची भ्रांत करायची गरज नाही. तुमचे कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळेल याची खात्री बाळगा. आणि शांत झोप लागण्यासाठी पुढील उपाय करा.
>> लहान मुलांसारखे फक्त झोपायचे आहे असे ठरवून त्या स्थितीचा आनंद घ्या. तुमचे मनच नाही तर शरीर आणि मुख्यतः डोकं हलके झाल्यासारखे वाटू लागेल.
>> संध्याकाळी हलका आहार घ्या. मांसाहार किंवा जड पदार्थ खाणार असाल, तर झोपण्याच्या चार तास आधी खा.
>> झोपण्याआधी कोमट पाण्याने स्नान करा. अंघोळीमुळे केवळ अंगावरचा मळ जातो असे नाही, तर त्यामुळे मनःशुद्धी सुद्धा होते.
>> ज्या खोलीत झोपता त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा. छोटीशी वाटणारी ही गोष्ट खूप प्रभावी ठरेल, करून बघा.
>> उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. कारण उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने मेंदूकडे रक्तस्त्राव होऊन अस्वस्थता वाढते. तुम्ही बर्फ़ाळ प्रदेशात राहात असाल तर दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नका आणि उष्म प्रदेशात राहात असाल तर उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. हा साधा नियम लक्षात ठेवा.
>> अलार्मच्या झटक्याने झोपेतून जागे होणे चांगले नाही. प्रत्येकाला आपल्या झोपेची गरज माहीत असते. त्यानुसार झोपेची वेळ पूर्ण करण्यासाठी लवकर झोपा आणि नैसर्गिक रित्या जाग येऊ द्या.
>> विश्रांतीच्या अवस्थेतून तुम्ही तेव्हा सक्रिय होण्यासाठी डाव्या कुशीवर वळून उठा. दोन्ही हात चोळून डोळ्यावर ठेवा. तुमची मज्जासंस्था जागृत होते. शरीर हलवण्याआधी मेंदू सक्रिय करणे गरजेचे असते.
लक्षात ठेवा, दिवसापेक्षा रात्रीच्या झोपेत तुमचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. त्यामुळेच सकारात्मकता वाढते आणि आयुष्य आनंदी होते. त्यामुळे साधी झोप नाही तर शांत झोप महत्त्वाची असते हे कायम लक्षात ठेवा!