जेवणाच्या शेवटी किंवा थोड्या वेळानंतर काही तरी गोडधोड खाण्याची सवय अनेकांना असते. मिठाई असो, डेझर्ट असो किंवा अगदी साखर देखील असो, जेवणानंतर गोड खाल्लंच पाहिजे असा बऱ्याच जणांनी नियमच करुन घेतलेला असतो जणू. पण वेळीच ही सवय बदलावी नाहीतर आरोग्याच्यादृष्टीनं अपाय होऊ शकतो. जेवण झाल्यानंतर गोड पदार्थांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असते, असे आयुर्वेदात म्हटले गेले आहे. जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खाण्याऐवजी सुरुवातीलाच त्याचे सेवन करावे. खरं तर दिवसाची सुरुवात करताना म्हणजे नाश्त्यामध्ये पौष्टिक गोड पदार्थाचे सेवन केल्यास आरोग्सासाठी उत्तम असते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. निरोगी आयुष्यासाठी सकाळचा नाश्ता करणं फार महत्त्वाचे असते. दिवसाची सुरुवात आपण योग्य आणि पौष्टिक नाश्त्यानं करायलाच हवी. यामुळे आपल्या यंत्रस्वरुपी शरीरात दिवसभराची ऊर्जा साठवली जाते. मात्र सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांना सकाळचा नाश्ता करणं शक्यच होत नाही. यामुळे अनेकाचं दिवसभराचं गणित चुकते.
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश करावा, पण ते पौष्टिक असतील तरच आरोग्यास फायदेशीर ठरतील. गोड पदार्थामुळे तात्काळ शरीराला उर्जा मिळते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होण्याचा धोकादेखील कमी होतो. कृत्रिमरित्या बनवलेले गोडाचे पदार्थ खाण्याऐवजी ते नैसर्गिक स्वरूपात खाणे अधिक फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ उन्हाळ्यात फळं किंवा हिवाळ्यात सुकामेवा खाणे अधिक फायदेशीर ठरते.
नाश्त्यामध्ये गोड का खावे?नाश्त्यामध्ये गोड पदार्थाचा समावेश केल्यास शरीराला ग्लुकोज मिळते. शिवाय, दिवसभरासाठी शरीराला ऊर्जादेखील मिळते व आपण अॅक्टिव्हदेखील राहतो. नैसर्गिकरित्या गोड असलेल्या पदार्थांचा नाश्त्यात समावेश करावा.
नाश्त्यामध्ये काय-काय असावे?- 5 बदाम, एक अक्रोड आणि एक कोरडे अंजिर, नारळाचे पाणी- शिरा- फळे- खोबऱ्यापासून बनलेले पदार्थ
मात्र जेवणाच्या शेवटी गोड खाणे टाळावेगोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर जेवणाच्या सुरुवातीला त्याचे सेवन करावे. गोड पदार्थानंतर खारट, आंबट पदार्थ खाल्ले पाहिजे. त्यानंतर शेवटी तिखट, कडू, तुरट पदार्थांचे सेवन करावे. या क्रमाने जेवण केल्यास पचनक्रियेवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. यामागील कारण असे की, जेवणाच्या सुरुवातीस गोड पदार्थ खाल्ल्यानं पोटातील वात कमी करण्यास मदत होते. गोड पदार्थानंतर आंबट, खारट खाल्ल्यानंतर लहान आतड्यांमधील पित्त उत्तेजित होते आणि जेवणाच्या शेवटी तिखट, कडू आणि तुरट पदार्थ खाल्ल्यास शरीरातील कफ नियंत्रणात राहतो. तसंच खूप उशिरा जेवू नये त्यामुळे अन्न पचण्यास अवघड होतं. अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यास पोटाचे विकार सुरू होतात. त्यामुळे पचनक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी जेवणापूर्वी गोड पदार्थ खावेत किंवा जेवत करताना मध्येच गोड पदार्थांचे सेवन करावेत. जेणेकरून अन्नाचे पचन योग्यरित्या होते, असे आयुर्वेदात म्हटले गेले आहे.