लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ७० ते ९० टक्के भारतीयांमध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव आढळून येत असल्याचे डॉक्टरांच्या अभ्यास अहवालातून समोर आले आहे. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुलांच्या वाढीवर तर प्रौढांमध्ये हाडांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या अभावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय तसेच श्वसनासंबंधी आजार होत असल्याचा धोका या अभ्यासातून समोर आणला.
पी. जी. तळवलकर, वैशाली देशमुख, एम. सी. दीपक आणि दिनेश अगरवाल यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘ड’ जीवनसत्त्वावर अभ्यासानुसार ८४.२ टक्के रुग्ण हे टाईप २ मधुमेहग्रस्त तर ८२.६ टक्के रुग्ण मधुमेहबाधित आढळले. या निरीक्षणानुसार जीवनसत्त्व ‘ड’ जीवनसत्त्वाचा गंभीर आजारांसोबत थेट संबंध आहे. आपल्या देखात संपूर्ण ‘ड’ जीवनसत्त्व, उच्च रक्तदाब, तसेच टाईप २ मधुमेह यांच्यात संबंध असल्याचे आढळले.
या अभ्यासात असे दिसून आले की, टाईप २ मधुमेह रुग्णांपैकी ८४.२ टक्के जणांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता होती, तर ८२.६ टक्के जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेविषयी तपासणी, निदान आणि उपचाराची गरज निर्माण झाली आहे, असे निरीक्षणातून मांडण्यात आले. याविषयी, डॉ. पी. जी. तळवलकर यांनी सांगितले की, ८४ टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेपायी टाईप २ मधुमेहाचे प्रमाण आढळले, तर ८२ टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सर्वाधिक ७६ टक्के हायपोथीरॉइड रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची अल्प पातळी आढळली.
या निरीक्षणातून नियमित तपासणीतून प्रारंभिक अवस्थेत निदान होण्याची गरज अधोरेखित झाली, ज्यामुळे ड जीवनसत्त्वाचे व्यवस्थापन होऊन बिगर संसर्गजन्य आजारांशी संबंधित ताण किंवा धोके कमी होण्यास मदत होऊ शकते. जीवनसत्त्व कमतरतेचे वाढते प्रमाण आणि अभावाचे परिणाम पाहता, ड जीवनसत्त्वाची गरज ओळखणे आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्याचेठरेल, असे नमूद करण्यात आलेआहे.