जर तुम्ही मास्कविना कोरोना रुग्णाजवळून जात असाल तर श्वास रोखून धरल्यानं किंवा कमी वेगानं श्वास घेतल्यानं तुम्ही संक्रमणापासून बचाव करू शकता. असं तुम्हालाही वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. आईआईटी मद्रासच्या एका अध्ययनात समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णाच्या जवळ जाताना श्वास रोखणं किंवा कमी वेगानं श्वास घेणं धोकादायक ठरू शकतं. याशिवाय संक्रमणाचा धोका वेगाने वाढू शकतो. एप्लाइड मेकॅनिक्स मॉडेल विभागाच्या पथकाने यावर संशोधन केले आहे. या पथकाने प्रयोगशाळेत श्वास घेण्याच्या वारंवारतेचे मॉडेलिंग केले आणि आढळले की एखाद्या व्यक्तीने जितक्या हळू आणि सखोल श्वास घेतला तितका विषाणू फुफ्फुसांमध्ये अधिक खोल जाण्याची शक्यता असते.
कमी वेगाने श्वास घेणं जास्त जीवघेणं ठरू शकतं
अर्णब कुमार मल्लिक आणि सौम्या मुखर्जी यांच्या संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक महेश पंचनगौला म्हणाले की,'' जेव्हा तुम्ही हळू हळू श्वास घ्याल तेव्हा एरोसोलचे कण जास्त काळ फुफ्फुसातच राहतात. यामुळे अधिक बदल होतात, एरोसोलचे कण फुफ्फुसांमध्ये खोलवर पोहोचतात आणि सखोल जमा होऊ शकतात. फुफ्फुसं तसेच श्वास घेण्याची पद्धतही व्यक्तीनुसार वेगळी असते. अशा परिस्थितीत नियंत्रण ठेवणे कठीण आहे.''
शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर लहान थेंबाद्वारे पसरतं कोरोनाचं संक्रमण
जगभरात आढळलेल्या कोरोनाव्हायरसच्या संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा एखाद्या संसर्गित व्यक्तीला शिंका किंवा खोकला येतो तेव्हा बहुतेक संसर्ग त्याच्या शिंका आणि खोकल्याच्या छोट्या थेंबांद्वारे पसरतो. आयआयटीएमच्या तज्ज्ञांनी फुफ्फुसातील गतिशीलतेची पुनरावृत्ती, श्वासनलिका, वायुमार्गाच्या आकारात असलेल्या लहान पेशी आणि रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणाचा अभ्यास केला होता.
असा करण्यात आला रिसर्च
अभ्यासासाठी, पथकाने फ्लोरोसेंट कण पाण्यात मिसळले आणि त्यातून एरोसोल तयार करण्यासाठी नेब्युलायझरचा वापर केला. शास्त्रज्ञांना असे आढळले की जेव्हा एरोसोलची हालचाल स्थिर असते तेव्हा कण फुफ्फुसात जमा होतात, परंतु जेव्हा हालचाल अशांत असते. तेव्हा त्याचे परिणाम दिसून येतात.
मास्क वापरणं फायदेशीर
प्राध्यापक म्हणाले की, ''आम्हाला असे आढळले आहे की मास्क घालणे खूप प्रभावी आहे. जर कोविड-पॉझिटिव्ह व्यक्तीने मास्क घातला असेल तर तो शिंकला किंवा खोकला असेल तर एरोसोल उत्पादन दर सुमारे १००० पटीने कमी केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती शिंकते किंवा खोकते, तेव्हा मास्क आपल्याला संसर्गापासून वाचवू शकतो.