Holding urine for a long time: अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी काही लोकांना लघवी रोखून धरावी लागते. अनेकांना तर लघवी रोखून धरण्याची सवयच लागते. कामाचं कारण देत ते लघवीला जात नाहीत. पण असं करणं अनेक दृष्टीने आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आपण लघवी जास्त वेळ रोखून धरण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत.
१) यूटीआय इन्फेक्शन
लघवी जास्त वेळ रोखून धरल्याने मूत्राशयामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. ज्यामुळे तुम्हाला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. यूटीआय इन्फेक्शनची समस्या सामान्यपणे महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. मात्र, ही समस्या पुरूषांना देखील प्रभावित करते. हे बॅक्टेरिया शरीरात जास्त वेळ राहिले तर जळजळ, वेदना आणि पुन्हा पुन्हा लघवी येण्याची समस्या होते.
२) ब्लॅडरवर दबाव
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने ब्लॅडरवर जास्त दबाव पडतो. ज्यामुळे मूत्राशयाच्या मांसपेशी कमजोर होऊ शकतात. अशात पुढे जाऊन तुम्हाला आपोआप लघवी पास होण्याची समस्या होऊ शकते. याने ब्लॅडरची क्षमताही कमी होते. ज्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी लागू शकते.
३) किडनीचं नुकसान
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीवरही वाईट प्रभाव पडू शकतो. जेव्हा तुम्ही लघवी जास्त वेळ रोखून ठेवता तेव्हा ब्लॅडरमध्ये बॅक्टेरिया आणि विषारी पदार्थ जमा होतात, जे किडनीपर्यंत पोहोचू शकतात. याने किडनीला इन्फेक्शन किंवा पायलोनेफ्राइटिस सारखी समस्या होऊ शकते.
४) ब्लॅडरमध्ये स्टोन
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने ब्लॅडरमध्ये स्टोन तयार होण्याचा धोका देखील वाढतो. लघवीमधील मिनरल्स आणि इतर तत्व जास्त काळ मूत्राशयामध्ये जमा राहतात, जे हळूहळू स्टोनचं रूप घेतात. या स्टोनमुळे मूत्राशयामध्ये वेदना, जळजळ आणि लघवीतून रक्त येणे अशा समस्या होतात.
५) प्रोस्टेटसंबंधी समस्या
पुरूषांनी नेहमीच जास्त वेळ लघवी रोखून ठेवली तर त्यांच्या प्रोस्टेट ग्लॅंडवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. यामुळे प्रोस्टेटाइटिस सारखी समस्या होऊ शकते. ज्यामुळे लघवीसंबंधी इतरही समस्या वाढू शकतात.