दात घासताना तोंडातून रक्त येतं. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं करणं घातक ठरू शकतं. दात घासताना दातातून रक्त येणं म्हणजे, तुमच्या हिरड्यांना सूज आलेली आहे. या समस्येवर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. अन्यथा गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्हाला डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचा नसेल तर तुम्ही घरच्या घरीही या समस्येवर तोडगा काढू शकता. जाणून घेऊया हिरड्यांची सूज कमी करण्याचे काही घरगूती उपाय...
1. लवंगाचे तेल
काही कडक पदार्थ खाल्यानं किंवा दात घासताना ब्रश लागल्याने हिरड्यांमधून रक्त येतं. अशावेळी थोडा कापूस घेऊन त्यावर थोडं लवंगाचं तेल घ्या आणि ते हिरड्यांवर आणि दातांवर लावा. थोड्या वेळांनं कोमट पाण्यानं गुळण्या करून तोंड धुवून घ्या.
2. मोहरीचे तेल
लवंगाप्रमाणेच मोहरीचे तेलही हिरड्यांसाठी फायदेशीर असतं. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मोहरीच्या तेलामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करून दातांवर आणि हिरड्यांवर मसाज करा. काही दिवसांतच हिरड्यांमधून रक्त येणं बंद होईल.
3. तुरटी
जर तुमचे दात दुखत असतील आणि दात घासताना रक्त येत असेल तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा. तुरटीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म असून रक्त थांबवण्यासाठी फायदेशीर असतं.
4. मीठ
दिवसातून निदान एकदातरी मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे वेदना कमी होतील. तसेच दात आणि हिरड्यांमधील इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
5. कोरफड
कोरफडीच्या गराने हिरड्यांवर मसाज करा. असे केल्यानं इन्फेक्शन कमी होतं आणि दातांसंदर्भातील अनेक प्रॉब्लेम्स दूर होतात.