Home Remedies For Itching: उन्हाळ्यात त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या सुरू होतात. यातील दोन कॉमन समस्या म्हणजे त्वचेवर खाज येणे आणि घामोळ्या होणे. गरमीमुळे खूप जास्त घाम येतो आणि अंगाची लाहीलाही होते. अशात घामामुळे आणि उष्णतेमुळे त्वचेवर खाज येते सोबत घामोळ्याही होतात.
त्वचेला येणारी खाज आणि घामोळ्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत.
खाजेची समस्या दूर कशी कराल?
1) त्वचेवर येत असलेल्या खाजेमुळे अनेकजण त्रस्त असतात. यावर घरगुती उपाय म्हणजे बर्फाचे तुकडे खाज येणाऱ्या जागेवर लावावेत. यामुळे काही प्रमाणात आराम मिळतो. तसेच बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळून पाच ते दहा मिनिटांपर्यंत खाज येत असलेल्या जागेवर लावावे.
2) शरीरावर येत असलेली खाज थांबविण्यासाठी मिठ, हळद आणि मेथी यांचे मिश्रण करा. तसेच हे मिश्रण आंघोळीपूर्वी अंगावर पाच मिनिटांपर्यंत लावावे. त्यानंतर पाच मिनिटांनी आंघोळ करावी.
3) उन्हाळ्यात मुलतानी माती त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरते. जर तुमच्या अंगावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीचा लेप लावावा त्यामुळे नक्कीच आराम मिळतो.
4) उन्हाळ्यात येणारा घामाचा वास, अंगाला खाज येणे तसेच जळजळ होण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी दररोज स्वच्छ आणि ताज्या पाण्यात आंघोळ करावी. पाण्यात काही कडूलिंबाची पाने टाकल्यास फार उत्तम.
घामोळ्यांपासून कशी होईल सुटका?
काकडी
काकडीमुळे शरीर थंड राहतं. एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस टाका. यातच काकडीचे काही तुकडे कापून टाका. हे काकडीचे तुकडे घामोळ्यांवर लावा. याने तुम्हाला आराम मिळेल.
कैरी
कैरीनेही शरीराची गरम दूर करण्यास मदत मिळते. आधी कैरी हलक्या आसेवर भाजा. त्यानंतर त्यातील गर शरीरावर लावा. याने घामोळ्या दूर होतील.
तुळस
तुळशीची पाने किंवा फांदी बारीक करून त्याचं पावडर तयार करा. याची पेस्ट घामोळ्यांवर लावा.
पावडर
घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर घामोळ्यांपासून बचाव करणारं पावडर लावा. घामोळ्यांचा त्रास असलेला भाग थंड आणि शुष्क राहील याची काळजी घ्या.
कोरफड
तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर /लोशन किंवा बर्फ लावणंदेखील फायदेशीर ठरेल.
फळांचा रस
नियमित भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल. पाण्यासोबतच ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी युक्त ड्रिंक्स यांचा आहारात समावेश वाढवा. तसेच कोल्ड ड्रिंक्स, कार्बोनेटेड बेव्हरेजेस पिणं टाळा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.