माणसाच्या पंचेंद्रियांमध्ये डोळ्यांना विशेष महत्त्व आहे. जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी असलेल्या पाच ज्ञानेंद्रियांमध्ये दृष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या लाइफस्टाईलमध्ये आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रामुख्याने स्क्रीन टाइम वाढला किंवा हवेतील प्रदूषण वाढल्यास आपल्या डोळ्यांना जास्त त्रास होतो. हवा प्रदूषणाबद्दल बोलायचं झाल्यास दसरा आणि दिवाळीदरम्यान भारतातील बहुतांश भागांत प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या वाढते. तसंच, याचकाळात हवामानातही मोठा बदल होत असतो. ही वेळ मान्सूनच्या परतण्याची आणि थंडीच्या आगमनाची असते. या काळात डोळ्यांना खाज येणं, जळजळ होणं, अशा समस्यांमध्ये वाढ होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.
दसरा आणि दिवाळीच्या काळात डोळ्यांच्या समस्यांचं प्रमाण अधिक वाढतं, हे अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. एक प्रकारची अॅलर्जी असं होण्यामागचं मुख्य कारण असू शकतं. या काळात अनेकांच्या डोळ्यांना खाज सुटते. या समस्येनं त्रस्त असलेले लोक हाताने डोळे चोळतात. परिणामी, समस्या कमी होण्याऐवजी ती आणखी वाढते. खालील घरगुती उपाय करून डोळ्यांची खाज आणि जळजळ कमी करता येऊ शकते.काकडी-काकडी हा पाण्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. त्यात असलेले अँटिबॅक्टेरियल घटक डोळ्यांतील खाज कमी करू शकतात. डोळ्यांना आराम मिळावा यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा लागेल. काकडीचा रस एका भांड्यात घेऊन फ्रीजमध्ये ठेवा. तो थंड झाल्यावर त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यांवर लावा. दिवसातून किमान दोनदा असं केल्यास दोन दिवसांत तुम्हाला फरक दिसेल.
कॅस्टर ऑईल (एरंडेल)डोळ्यांची खाज दूर करण्यासाठी एरंडेल हा उत्तम पर्याय मानला जातो. त्याचा वापर करण्यासाठी एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात कापूस भिजवा. तेलात भिजवलेला कापूस डोळ्यांभोवती लावा. डोळ्यांच्या त्वचेजवळ संसर्ग झाल्यासही खाज येऊ शकते. एरंडेल तेलामध्ये असलेले औषधी गुणधर्म ही खाज दूर करतात.
थंड पाणी-डोळ्यांची वारंवार जळजळ होत असेल किंवा खाज येत असेल तर थंड पाण्याचा वापर करावा. तोंडात पाण्याची गुळणी घ्या आणि डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. साधारण एक मिनिटभर ही क्रिया करा. नंतर स्वच्छ कपड्यानं डोळे पुसून घ्या. सणासुदीच्या काळात डोळ्यांची जळजळ किंवा खाज वाढल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावेत.
वरील तिन्ही उपाय घरच्याघरी सहज करता येतील असे आहेत. या वर्षी दसरा-दिवाळीच्या काळात किंवा इतरही वेळी तुम्हाला डोळ्यांची जळजळ किंवा खाजेची समस्या वाढली तर नक्की याचा वापर करून बघा. हे उपाय करूनही आराम मिळाला नाही तर मात्र, नेत्रतज्ज्ञांची भेट घ्या.