वातावरणात बदल झाला की, डेंगूची समस्या डोकं वर काढते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे अनेक आजारांनी डोकी वर काढली आहेत. या आजारांमध्ये प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रामुख्याने समावेश असतो. आता तर डेंगू पसरवणाऱ्या डासांमुळेच झिका वायरसही पसरू लागला आहे. झिका वायरसवर अजून कोणतही ठोस असं औषध मिळालं नाहीये. त्यामुळे या आजारापासून बचाव करण्यासाठी सध्या सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात डास येऊ न देणे. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम साधारणतः 8 तास राहतो.
लिंबाचं तेल आणि निलगीरी तेलाचं मिश्रण डासांना घरापासून दूर ठेवण्याचा सर्वात चांगला पर्याय मानला जातो. या मिश्रणाबाबत सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, हा उपाय नैसर्गिक आहे. दोन्ही तेलांचं मिश्रण तुम्ही अंगावर लावू शकता. याने तुम्हाला डास चावणार नाहीत.
दारात किंवा खिडकीत तुळशीचं रोपटं असेल तरिही मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.
लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.
लव्हेंडरचा सुगंधानेही डास दूर पळतात. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनरचा वापर करा.