बदलत्या हवामानामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि त्यामुळे घसा खराब होणे यासारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. घशामध्ये खवखव होण्यासोबतच बोलतानाही त्रास होतो. तसेच सतत खवखव होण्यामुळे जेवताना, पाणी पितानाही घशाला त्रास आणि वेदनाही होतात. घशामध्ये वेदना या बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होत असून यामुळे सूजही येते. घशातील वेदना आणि सूज दूर करण्यासाठी काही घरगूती उपाय जाणून घेऊयात.
मीठ आणि गरम पाणी
घशात होणाऱ्या खवखवीपासून सुटका करून घेण्यासाठी मीठ आणि गरम पाणी हा उत्तम पर्याय मानला जातो. यासाठी एक ग्लास पाणी गरम करून त्यात थोडं मीठ मिश्रित करा. या पाण्याने दिवसातून दोन-तीनदा गुरळा करा. यामुळे घशातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होईल.
लिंबू आणि गरम पाणी
एक कप गरम पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हर्बल चहा
मिरी, तुळस आणि लवंग यांसारखे पदार्थ घालून बनवलेला चहा हा उत्तम उपाय मानला जातो. यामुळे घशातील खवखव, वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
हळदीचे दूध
गळ्याच्या वेगवेगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून हळदीचे दुध गुणकारी ठरते. यामुळे गळ्याला झालेले इन्फेक्शन दूर होतात.
मध
मध खोकला आणि घशातील वेदना कमी होण्यासाठी उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे मध घ्या. त्यामुळे आराम मिळेल.