-Ravindra More
सध्याच्या धावपळीच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. काही शारीरिक त्रास जाणवल्यास लागलीच डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब करुन औषधोपचार केल्याने आपल्याला बरेही वाटते. या वेगवेगळ्या उपचार पद्धतीत होमिओपॅथी ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आजच्या सदरात आपण होमिओपॅथी आणि तरुणाईच्या समस्या याबाबत जाणून घेऊया...
ज्यावेळी सोरा, सिफीलीस व सायकोसिस या तीन मायझम्स (त्रिदोष) च्या संतुलनात बिघाड होतो, त्यावेळी सम: समं शमयंती या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या लक्षण स्वरुप सारखे होमिओपॅथीक औषध दिले जाते व औषधाने या तिन्ही मायझममध्ये समन्वय साधला जातो. या समन्वयामुळे रोग प्रतिकार क्षमता वाढते व आजार आपोआप समूळ नष्ट होतो.
होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये औषध निवडताना सर्वप्रथम रुग्णाची वैयक्तिक माहिती घेतली जाते. ज्यामध्ये रुग्णाची शारीरिक व मानसिक लक्षणे, विचार, सवयी, आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना व त्या घटनांचा रुग्णाच्या मनावर कोण-कोणत्या स्वरुपात परिणाम झाला व रुग्ण त्या घटनेचा कसा विचार करतो यासारखी बरीच लक्षणे विचारात घेतली जातात.
होमिओपॅथी ही खूप लवकर, कमी वेळेते रुग्णाला बरी करणारी उपचार पद्धती आहे. बरे होण्यास लागणारा वेळ हा त्या आजारावर अवलंबून आहे. जसे थंडी, ताप, जुलाब, पोटदुखी अशा अवस्थेत होमिओपॅथीने थोड्याच वेळात आजार संपूर्णपणे घालवता येतो.
परंतू गंभीर आजार जीर्ण झाल्यावर आजाराची गुंता वाढल्यावर रुग्ण आल्यास ती गुंता सोडवण्यास थोडा वेळ लागतो. होमिओपॅथीने आज टॉन्सिलायटीस, अॅपेंडीसायटीस, किडनी स्टोन, मुळव्याध, भगंदर, गर्भाशयाच्या गाठी यासारखे अनेक शस्त्रक्रिया करावे लागणारे आजार कोणतीही शस्त्रकिया न करता बरे केले जातात व आजार परत उद्भवू नये यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते.
या उपचार पद्धतीत अगदी लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना सर्व आजारांवर औषध घेण्यास फार सोपे असून चेतना शक्तीला उत्तेजना दिली जाते. या आधुनिक होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार झाल्याने रुग्णांचा कल या उपचार पद्धतीकडे वाढला आहे. त्यामुळे आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरसारख्या आजारांवर होमिओपॅथी प्रभावशाली ठरतेय.
तरुणाई व होमिओपॅथी
सध्याच्या धावपळीच्या व धकाकीच्या जीवनात पौगंडावस्थेतील चिडचिड, अभ्यासात लक्ष न लागणे, डिप्रेशन, प्रेमभंगातून निर्माण होणारे मानसिक आजार वाढत आहेत. यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धतीने मनाची लक्षणे व शारीरिक लक्षणे याची सांगड घालून आजार पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.
बदलत्या जीवनशैलीनूसार तरुणांनी योग्य व्यायामाबरोबरच संतुलित आहार, खानपानावरदेखील विशेष लक्ष दिले पाहीजे. अन्यथा कमी वयातच लठ्ठपणा, उच्च रक्त दाब यासारखे आजार उद्भवू शकतात.
किशोरावस्थेत शरीरातील हार्मोन्सच्या बदलावामुळे चेहºयावरील मुरुम (तारुण्यपिटीका) येण्यास सुरूवात होते व त्यामुळे स्वत:बद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. तर हार्मोन्सच्या बदलावामुळे मासिक चक्र नियमित न येणे व त्यामुळे येणारा शारीरिक थकवा तसेच पीसीओडी सारख्या आजारांमुळे मुलींना चेहºयावर अनावश्यक केस वाढणे व वजन वाढणे यासारख्या समस्या भेडसावू शकतात.
अशा प्रकारच्या तरुणाईच्या व्याधींमध्ये होमिओपॅथी उपचाराने आजार कमी वेळात सोप्या पद्धतीने समुळ नष्ट होतात आणि मन व शरीर निरोगी बनते