- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)
एखाद्याच्या 'दिसण्यावर जाऊ नको' असं आपण म्हणतो, तेव्हा काय मनांत असते? साधारणपणे, 'वरून दिसायला साधाभोळा दिसत असला तरी आतून पक्का बेरड आहे' किंवा 'दिसायला एकदम हुशार पण तोंड उघडले की कळते' अशी काही वाक्य मनांत असतात. बहुतेक वेळा आपण रूपरंग बघून आपले मत बनवितो. तसेच काहीसे कुळीथ या बिचाऱ्या कडधान्याबद्दल झाले आहे. हे बहुपयोगी कडधान्य खायला सांगितले की लोक नाक मुरडतात.
काय गंमत आहे, आपण म्हणतो चव हे जिभेचे काम तर वास हे नाकाचे काम. पण चव कळण्यात मोठा वाटा नाकाचाही असतो. असं म्हणतात की सर्दीमुळे नाक बंद झाले तर चवही कळत नाही. डोळे मिटून, नाक चोंदलेल्या अवस्थेत बटाटा किंवा सफरचंद काहीही खा, चवीत फरक कळत नाही. मी हा प्रयोग कधी केलेला नाही. एक तर बटाटा कच्चा खायचा ही कल्पनाच करवत नाही. सफरचंद हे डॉक्टरला लांब ठेवते अशी म्हण तुम्हाला माहीत असेल तसेच डॉक्टरही सफरचंदाला लांब ठेवतात म्हणून हा प्रयोग केलेला नाही. जिज्ञासूंनी करून पहावा. एका योगाचार्यांना मी ही गोष्ट सांगितली तर ते म्हणाले की, 'योग करणाऱ्यांच्या बाबतीत हे शक्य नाही कारण नियमित योग करणाऱ्यांना सर्दीच होत नाही'.
चव आवडली नाही तर नाक मुरडतात, वास आवडला नाही तर तोंड वाकडं करतात. दिसायला गोष्ट आवडली नाही तर पाठ फिरवतात. तसंच बिचाऱ्या कुळथाबद्दल घडते. मी जेव्हा कुणाला कुळीथ खायला सांगतो तेव्हा लोक 'नको नको' म्हणतात किंवा 'कुळीथ म्हणजे काय?' असे विचारतात. त्यातल्या कोणीही कुळीथ खाल्लेला नसतो. मग घरी जाउन गुगल वर बघतात, कुळीथ कसा दिसतो ते. गुगल वर वाचतात की 'त्याला इंग्रजीत हॉर्स ग्रॅम म्हणतात आणि ते घोड्यासाठी उत्तम खाद्य आहे' आणि 'हे आपण नाही खाणार ब्वा' असे म्हणून कुळीथ खात नाहीत.
खरेतर कुळीथ हे खरोखरी सुपरफूड आहे. लोह, कॅल्शियम भरपूर. प्रोटीन्स भरपूर. या सोबत मधुमेहावर गुणकारी. जेवताना इतर अन्नासोबत खाल्ले तर जेवणानंतर साखर वाढत नाही. ज्यांना शरीरात पाणी साठण्याचा त्रास असतो, त्यांच्यासाठी अतीशय उपयुक्त. किडनी, हार्ट आणि कोलेस्टेरॉल संबंधी आजार आणि ब्लड प्रेशरवर उपयुक्त.
इतका बहुगुणी पदार्थ तो दिसायला चांगला नाही, म्हणून लोक खात नाहीत. स्वस्त सुपरफूड आहे हे. अजूनही गावाकडे 'गडी माणसांना' देण्याचा पदार्थ म्हणून कुळीथाकडे बघितले जाते.
म्हणूनच चोखामेळ्याचा अभंग आठवतो, 'का रे भुललासी वरलिया रंगा'