(Image Credit : TheHealthSite.com)
नवी दिल्ली : वायू प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होतो हे आता अनेकांना माहीत असेलच. पण वायू प्रदूषणामुळे केवळ श्वसनावरच नाही तर मेंदुवरही प्रभाव पडतो. खासकरुन वयोवृद्धांच्या मेंदुवर वायू प्रदूषणाचा इतका वाईट प्रभाव पडतो की, अनेकांना बोलण्यासाठी तोंडातून शब्द काढण्यासाठीही त्रास होतो. हिशोब करण्याची क्षमताही फार घटते.
अमेरिकेतील येल आणि चीनच्या पेकिंग यूनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जर एखादा व्यक्ती फार काळ वायू प्रदूषणाच्या कचाट्यात राहिला तर त्यांची स्मरणशक्तीवर फार वाईट परिणाम होतो. हा प्रभाव महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक बघण्यात आला आहे. खासकरुन वयोवृद्ध पुरुषांमद्ये.
या शोधादरम्यान २०१० ते २०१४ दरम्यान चीनच्या ३२ हजार लोकांचा सर्वे करण्यात आला. यात वायू प्रदूषणाचा त्यांच्या आरोग्यावर, मेंदुवर काय प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यात आला. या शोधाचे लेखक जियाबो जॅंग यांच्यानुसार, वायू प्रदूषणामुळे लोकांची बोलण्याची क्षमता अधिक प्रभावित होते. खासकरुन पुरुषांमध्ये ही समस्या वाढत्या वयासोबत वाढत जाते.
वॉशिंग्टन येथील इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टीट्यूटनुसार, या शोधातून असे समोर आले आहे की, जे लोक जास्त काळ वायू प्रदूषणाच्या कचाट्यात अडकलेले असतात, त्यांची बोलण्याची आणि हिशोब करण्याची क्षमता फार जास्त घटते.