थंडीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे वातावरण बदलामुळे अनेक आजारांचाही धोका वाढू शकतो. यात प्रामुख्याने सर्दी-खोकला या समस्या अधिक होत असल्यातरी इतरही आजारांनी ग्रस्त रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या दिवसात हृदय रोगांचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. या दिवसात अधिक थंडीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. पण योग्य ती काळजी घेतली तर हा धोका टाळता येऊ शकतो. द हेल्थ साईट या हेल्थ वेबसाईटला डॉक्टरांनी याबाबत काही सल्ले दिले आहेत. त्यात त्यांनी हृदय रोगाने ग्रस्त रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी हे सांगितले आहे.
१) हायपोथरमिया
हायपोथरमिया म्हणजेच अचानक शरीराचे तापमान कमी होणे. हिवाळ्यात गरम कपडे परिधान केल्यावरही शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकतं. अचानक शरीरात ऊर्जा निर्माण होण्याची क्रिया थांबल्याने त्रास होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ती काळजी घ्यावी.
२) ऑक्सिजनचा कमी पुरवठा
हिवाळ्यात अचानक शरीराचं तापमान कमी होण्याची अधिक शक्यता असते. अशात या समस्येमुळे आणखीही काही समस्या निर्माण होतात. अचानक शरीराचे तापमान कमी झाल्याने रक्तवाहिन्या आणि धमन्यादेखील आकुंचन पावतात. यामुळे हृदयाला होणार्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण होते आणि याने तुमची समस्या अधिक वाढू शकते.
३) व्हिटॅमिन डीची कमतरता
हृदय निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, रक्तदाब आणि मधुमेह वाढण्याला शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असलेला आहार घेतल्यास फायदा होईल.
४) कोलेस्ट्रॉलं प्रमाण वाढतं
बदलत्या वातावरणानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाणदेखील कमी-जास्त होत असतं. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना कोलेस्टेरॉलचा नेहमीच त्रास होत असतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार घ्या.