डॉ. नितीन पाटणकर
डाएटिंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस किती वेगाने वाढतेय, हे वेगळं सांगायची गरज नाही. डाएट करणारी मंडळी आपल्या अवतीभवतीही असतील आणि त्यांच्या डब्यात कच्चं सलाड तुम्हीही पाहिलं असेल. सुरुवातीचे तीन-चार दिवस या सलाडवर भरभरून बोलणारे, त्याची महती सांगणारे सात दिवसांनी 'मूग गिळून गप्प' बसलेले दिसतात आणि दहाव्या दिवशी तो 'पाला' त्यांच्या डब्यातून गायब झालेला असतो. पण खरं तर तो 'पाला' वाईट नसतो, उलट आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. चुकलेली असते ती, हे सलाड बनवण्याची पद्धत. त्यामुळेच हे सलाड लाडाचं व्हावं, यासाठी काही टिप्स...
माझ्याकडे येणाऱ्या पेशंटना मी कायम सांगतो की भरपूर रंगीबेरंगी पदार्थ खात जा. प्रत्येक रंग हा वेगळ्या अँटिऑक्सिडेंटचा प्रतिनिधी असतो. वेगवेगळ्या सॅलड्सचा समावेश जेवणात अवश्य करावा असा सल्ला मी कायम देतो. पण त्याच जोडीला हेही आवर्जून सांगतो की ही सॅलड्स कच्ची खायची नाहीत. ज्या ज्या गोष्टी सॅलड्ससाठी आणलेल्या आहेत त्या हलक्या वाफवून घेणं गरजेचं आहे. वाफवून किंवा मग त्या थोड्याशा परतून घेतल्या, त्याला मनाजोग्या मसाले, चटण्या यांची साथ दिली तर उत्तम. याने जंतुनाशन होतेच. त्याच सोबत सॅलड्स पचायला थोडी सोपी होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चवीला छान होतात. चवीशिवाय डाएट म्हणजे पेट्रोल शिवाय विमान. म्हणूनच लाडाच्चा सलाडची अगदी सोपी कृती तुमच्यासोबत शेअर करतोय. बाजारात किंवा सुपर मार्केटमध्ये हल्ली सॅलड्ससाठी मिळणाऱ्या भाज्या वापरून करता येणारा हा प्रकार अगदी रोजही खायला हरकत नाही.
फरसबी, झुकिनी, कोबी ,लेट्यूस, गाजर, सिमला मिरची, बिट यांचे तुकडे करून घ्यायचे. आवडत असल्यास यात टोमॅटो आणि त्रास होत नसल्यास ताजे मश्रुमही घ्यायला हरकत नाही. अनेकांना फ्लॉवरचा वास आवडत नाही. सीझनमध्ये फ्लॉवर आणि हिरवी ब्रोकोली भरपूर मिळते. फ्लॉवर आणि ब्रोकोलीचे तुकडे करून उकळत्या पाण्यात मीठ घालून दोन मिनिटं ठेवून साफ करून घ्यायचे. यानंतर एका कढईत तीळ/ olive / शेंगदाणा किंवा दररोजच्या वापरातलं चमचाभर तेल गरम करून त्यात दोन पाकळ्या लसूण आणि आवडत असल्यास आलं घालून १ मिनिट फ्राय करायचं आणि तुकडे करून ठेवलेल्या/ चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. मध्यम आचेवर हलवत तीन-चार मिनिटं ह्या भाज्या हलक्या परतून वाफवून घ्यायच्या. गॅस बंद करून थंड झाल्यावर त्यात टेबल सॉल्ट, मिरपूड घालून खाण्यासाठी तयार. आवडत असल्यास त्याच लिंबाचा रस घालायला हरकत नाही.
उत्तम खाण्याच्या जोडीला गिल्ट फ्री खाणं स्वस्थ शरीराची गरज आहे. म्हणूनच या सॅलड्सचे वेगवेगळे प्रकार आपणच करून पाहायचे आणि रूचिपालट करायचा.