-निकिता महाजन
मिठ. किती महत्वाचं. ते सांडू नये, कुणाकडे मागू नये असं आपण म्हणतो. चिमूटभर मिठ जेवताना ताटात रोज वाढूनच घेतो. पण कधी विचार केलाय की, रोज आपण किती ग्रॅम मिठ खातो? ंम्हणजे किती ग्रॅम? तुम्ही म्हणाल असं मिठ काय कुणी वजनावर मोजून खातं का? खात नाहीच, पण अती मिठ खाणं म्हणजे किती आणि प्रमाणात म्हणजे किती हे तर आपल्याला माहिती हवं? जागतिक आरोग्य संस्थेच्या अभ्यासानुसार रोज पाच ग्रॅम मिठ खाणं प्रमाणात म्हणता येईल त्यापेक्षा अधिक खाणं तब्येतीसाठी घातक.युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉँग्रेसच्या अभ्यासानुसार मिठाचे मोजमाप हा जगभरच काळजीचा विषय असल्याचं समोर आलं आहे. दररोज 13.7 ग्रॅम किंवा त्यापेक्षा अधिक मिठ खाणार्यांना रक्तदाबासह अन्य व्याधींचा धोका अन्यांपेक्षा जास्त असतो. आणि सतत अधिक मिठ खाल्लयानं हे आजार होण्याचा संभव वाढतो. त्यापेक्षा कमी 6.8 ग्रॅम मिठ खाणार्यांचा धोका कमी असला तरी त्यांचं मिठ खाण्याचं प्रमाण हे सरासरीपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे दिवसाला 5 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी मिठ खाणं आरोग्यासाठी उत्तम.आता प्रश्न असा की, मिठ आपण असं ग्रॅममध्ये मोजून खात नाही. चिमूटभरच खातो. पण तरीही खारट पदार्थ न खाणं, जेवताना वरुन मिठ न घेणं हे असे नियम पाळले तरी आपल्या मिठ खाण्यावर जरा आळा घालता येईल. त्यामुळे मिठाकडे लक्ष द्या, खारट खाऊन उगीच बिपी वाढवण्यात काही हशिल नाही.