मोमो चॅलेंजबाबतची वॉर्निंग गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगाने पसरत आहे आणि पालक या गोष्टीने चिंतेत आहेत की, अशा तथाकथित व्हिडीओजमधून मुलांना स्वत:ला इजा करून घेण्यासाठी भाग पाडलं जातं. तसेच पालकांना न सांगता असे काही टास्क दिले जातात, ज्याचा मुलांवर पूर्णपणे नकारात्मक प्रभाव पडतो. याप्रकारच्या गोष्टी जेव्हा इंटरनेटवर व्हायरल होतात तेव्हा अर्थातच पालक त्यांच्या मुलांबाबत चिंता करतीलच.
सत्य नाही अफवा आहे मोमो चॅलेंज
मीडिया रिपोर्टनुसार, मोमो चॅलेंज ही अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. फॅक्ट्स चेक करणारी साइट स्नोप्सनुसार, हे मोमो चॅलेंज पहिल्यांदा २०१८ च्या मध्यात आलं होतं. ज्यात कोणत्याही पुराव्याशिवाय या चॅलेंजशी संबंधित रिपोर्ट्स समोर आले होते. यूट्यूबने सुद्धा यावर सांगितलं की, मोमो चॅलेंज दाखवण्याचा किंवा प्रमोट करण्याचा कोणताही व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इतक्यात आढळला नाही. मग असं असूनही पालकांमध्ये इतकी भीती आणि चिंता कशासाठी आहे?
मुलांशी संवाद साधा
एक्सपर्ट्सनुसार, इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या लहान मुलांशी संबंधित अफवा पालकांच्या भीतीचं कारण आहे. ज्यात त्यांना त्यांच्या मुलांना ऑनलाइनच नाही तर कोणत्याही प्रकारच्या निगेटीव्ह परिस्थितीपासून बचाव करायचा आहे. या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी पालक काय करू शकतात? तर पालकांनी त्यांच्या पाल्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. त्यांच्याशी हे बोलायला हवं की, ते ऑनलाइन काय बघतात. त्यासाठी मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्यानुसार त्यांच्यासोबत बोला. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना हे समजावून सांगा की, इंटरनेटवर असणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नसते.
फोनमध्ये पॅरेंटल सेटिंग करा
मुलांशी संवाद साधण्यासोबतच पालक मुलांना जे गॅजेट्स देतात किंवा सोयी-सुविधा देतात त्यात पॅरेंटल सेटिंग्सचा वापर करा. जेणेकरून ते तेच बघू शकतील जे तुम्हाला त्यांना दाखवायचं आहे. त्यासोबतच मुलांना त्यांचे आवडीचे शोज आणि चॅनल्सचे अॅप डाऊनलोड करू शकता. जेणेकरून मुलं यूट्युबवर जाणार नाहीत आणि इतरही वेगळ्या गोष्टींच्या संपर्कात येणार नाहीत.